Nashik Crime : बांधकाम व्यावसायिकास तपास यंत्रणेची व जिवे मारण्याची धमकी देवून खंडणीची मागणी करुन 5 लाख रुपये खंडणीची रक्कम स्विकारुन पुन्हा खंडणीची मागणी करणारा संशयितास नाशिक (Nashik) पोलिसांच्या युनिट 01 च्या गुन्हेशाखेच्या पथकाने अटक केली आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बांधकाम व्यावसायिकाकडे मागितलेल्या खंडणी प्रकरणी सरकारवाडा पेालीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला होता. सदर गुन्हयातील संशयित मारुती खोसरे याने फिर्यादी समीर सोनवणे यांचे शरणपुर रोडवरील सुयश डेव्हलपर्स या ऑफिसमध्ये काम करीत असतांना ऑफिस मधील संगणकामधुन महत्वाच्या डाटाची चोरी करुन त्याद्वारे फिर्यादी यांना तपास यंत्रणेकडे तक्रार करण्याची व जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. त्याचबरोबर खंडणी स्वरुपात 50 लाख रुपयाची मागणी करुन, त्यापैकी 5 लाख रुपये खंडणीची रक्कम घेवून पुन्हा उर्वरीत खंडणीचे पैसे देण्याचा तगादा लावला होता. या प्रकरणी फिर्यादी यांनी सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला होता. 
 
दरम्यान सदर गुन्ह्याच्या तपासा कामी  गुन्हे शोध पथक कार्यरत होते. तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी अथक परिश्रम घेवून चार तासाचे आत संशयितास नाशिक शहरातील शिवाजीनगर सातपुर परिसरात शोध घेवून संशयित मारुती रमेश खोसरे, (सातपुर, नाशिक) यास शिताफीने पकडुन ताब्यात घेतले. 


संशयिताकडे अधिक विचारपूस केली असता सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास गुन्हयात अटक करण्यात अली आहे. तसेच पोलीस कस्टडी रिमांड दरम्यान त्याच्याकडून फिर्यादी यांना तपास यंत्रणेकडे तक्रार करण्याची व जिवे मारण्याची धमकी देवून त्यांच्याकडून घेतलेली 5 लाख रुपये खंडणीची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ हे करीत आहेत. 
 
सदरची कामगिरी जयंत नाईकनवरे पोलीस आयुक्त नाशिक, संजय बारकुंड, पोलीस उप आयुक्त गुन्हेशाखा नाशिक शहर, वसंत मोरे, सहा.पोलीस आयुक्त गुन्हेशाखा, नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोउनि. विष्णू उगले व पोलीस अंमलदार रविंद्र बागुल यांच्या पथकाने कामगिरी केली आहे.