Nashik Bhavali Dam : इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील भावली धरणाच्या (Bhavali Dam) बॅकवॉटर परिसरात अंघोळीसाठी गेलेला एक तरुण वाहून गेल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. अखेर आज सकाळी एनडीआरएफच्या (NDRF Sqaud)  पथकाला तरुणाचा मृतदेह सापडला असून पुढील कार्यवाही करण्याचे काम सुरु आहे. 


सध्या भावली डॅम परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यातच रविवार असल्याने पर्यटक मोठया प्रमाणावर आले होते. यावेळी पर्यटनासाठी आलेला तरुण भावली धरणाच्या बॅकवॉटर परिसरात पोहण्यासाठी गेला असता वाहून गेल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी तातडीने कसारा येथील आपत्ती व्यवस्थापन टीमचे प्रमुख शाम धुमाळ यांना आणि इगतपुरी येथील महिंद्रा कंपनीच्या पथकाला तातडीने कळवुन घटनास्थळी पाचारण केले. 


इगतपुरीजवळ असणाऱ्या एका बांधकामाच्या साइटवर सुपरवायझर म्हणून सुनील सोनू सांगळे हा काम करतो. सोबत काम करणारे इतर सहकारी सुहास जगताप, ऋषिकेश गावले, दिनेश पंडित यांचे सोबत जवळ असणाऱ्या जांमुंडे गावाच्या परिसरात जेथे भावली धरणाचे बॅकवाॅटर आहे. या ठिकाणी दुपारच्या सुमारास आंघोळीसाठी गेले होते. यावेळी सुनील सोनू सांगळे याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला. काल दुपारी ही घटना घडली. 


दरम्यान घटनेची माहिती आपत्ती व्यवस्थापन टीमचे प्रमुख शाम धुमाळ यांना मिळाल्यांनतर ते तातडीने पथकांसह घटनास्थळी रवाना झाले. यावेळी चंद्रकांत सराई, सुरेश तेलम यायच्या पथकाने सुनील सांगळे याचा शोध घेतला, मात्र त्यांना उशिरापर्यंत यश आले नाही. काल दिवसभर आपत्ती व्यवस्थापनच्या टीमने शोधकार्य केले, मात्र आज पाऊस जास्त असल्याने पाण्याचा जोर वाढत असल्याने रात्री ऊशिरा पर्यंत शोधण्याचा प्रयत्न केला मात्र यश आले नाही. आज सकाळी सहा वाजेपासून पुन्हा एकदा शोधकार्य सुरु करण्यात आले. यावेळी शोध पथकाला तरुणाचा मृतदेह भावली धरणात आढळून आला. भावली धरण परिसरात वनविभागाने पर्यटकांना बंदी घातलेली असतांनाही पर्यटक चोरी छुप्या मार्गाने पर्यटनस्थळी दाखल होत असल्याने असे अनुचित प्रकार होत असल्याचे समोर येत आहे. 


पर्यटन करा पण जपून!
दरम्यान नाशिक (Nashik) वनविभागाने बंद करण्यात आलेली पर्यटन स्थळे खुली केली आहेत. मात्र यापुढे पर्यटनस्थळांवर हुल्लडबाजी खपवून घेतली जाणार नाही. यासाठी प्रशासनाने नियम घालून दिले आहेत. पर्यटनस्थळी पर्यटकांनी मद्यपान व धूम्रपान करून हुल्लडबाजी करू नये, वनअधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पर्यटकांनी या सूचनांचे पालन करावे अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा वनविभागाकडून देण्यात आला आहे. मात्र सूचना देऊनही पर्यटकांच्या जीवावर बेतण्याचे प्रकार समोर येत आहेत.