Nashik News : नाशिकचा (Nashik) बहुचर्चित सिटी सेंटर मॉल ते त्रिमूर्ती चौक दरम्यानचा उड्डाणपूल (Bridge) करण्याची गरज नसल्याचा निर्वाळा आय आयटी पवईने दिला आहे. त्यामुळे एकप्रकारे नाशिककर आणि पर्यावरण प्रेमींच्या लढ्याला यश आले आहे. शिवाय शिवसेना (Shivsena) आणि भाजप पक्षातील (BJP) नेत्यांचा विशेष रस असलेला असल्याने त्यांनाही चांगलाच दणका बसला आहे. 


गेल्या अनेक वर्षांपासून या उड्डाणपुलाच्या कामकाज संदर्भात चढाओढ सुरू होती. महापालिकेत भाजपाची सत्ता असताना जानेवारी २०२१ मध्ये सिटी सेंटर मॉल तसेच मायको सर्कल येथे दोन उड्डाण पूल बांधण्यास मंजुरी दिली गेली. मात्र मंजुरी दिल्यानंतर निविदा प्रक्रियेपर्यंत हे पूल चांगेलच चर्चेत आले. या पुलावरून प्रथम भाजप व सेनेत खटके उडाले, मात्र कालांतराने एकमेकांच्या गळ्यात हात गुंफत मंजुरी दिली गेली. नाशिक महापालिकेची आर्थिक परिस्थिती कमजोर असताना अनेक नियम ढाब्यावर बसवून मंजुरी घेत उड्डाणपुलाचा मार्ग प्रशस्त केला होता. 


दरम्यान उभा उड्डाणपुलाच्या विरोधात इतर पक्षाच्या नेत्यांनी जोरदार विरोध केला. शिवाय त्या विरोधात उच्च न्यायालयात देखील याचिका दाखल करण्यात आल्या. तसेच या उड्डाणपुलांमुळे रस्त्यात येणाऱ्या अनेक पुरातन वृक्षांवर घाला घालण्यात येणार होता. यासाठी नाशिककर आणि पर्यावरण प्रेमींचा देखील या उड्डाणपुलांना विरोध होता. या पार्श्वभूमीवर अनेक आंदोलने देखील झाली. हि बाब तत्कालीन पर्यावर मंत्री आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोहचली. त्यांनी दखल घेत ते स्वतः नाशिकमध्ये दाखल होत पाहणी केली होती. 


तर दुसरीकडे नाशिक मनपाच्या (Nashik NMC) आयुक्तपदी रमेश पवार यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी उड्डाणपुलाची गरज काय? असा निष्कर्ष काढला. तक्रारी येऊ लागल्यानंतर त्यांनी शहराची स्काय लाईन खराब होऊ नये असाही शब्द दिला. त्यानंतर ट्रॅफिक सर्वेक्षण न करताच उड्डाणपुलाची प्रक्रिया केल्याचा ठपका ठेवला गेला होता. तसेच उच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका देखिलड दाखल करण्यात आल्या. तसेच तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मायको सर्कल येथील उड्डाणपूल रद्द करण्याचे आदेश दिल्यानंतर सिटी सेंटर मॉल येथील पूल उभारण्यापूर्वी ट्रॅफिक सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आयआयटी पवईचा सल्ला घेण्याचे ठरले. त्यानुसार अहवाल आला असून त्यांनी उड्डाणपुलाची गरज नसल्याचा अभिप्राय दिल्याची माहिती मावळते आयुक्त रमेश पवार यांनी दिली. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या अडीचशे कोटींची बचत होणार आहे. 



मनसेतर्फे जल्लोष 
नाशिक महानगरपालिकेतर्फे शहरातील संभाजी चौक, सिटी सेंटर मॉल ते त्रिमूर्ती चौक असा प्रस्तावित उड्डाणपुलाला स्थानिक नागरिकांचा असलेल्या विरोधाच्या अनुषंगाने सदर उड्डाणपुल त्वरित रद्द करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेने दाखल केलेल्या याचिकेला यश आल्याने जल्लोष साजरा करण्यात आला. मायको सर्कल पाठोपाठ त्रिमूर्ती चौकातील उड्डाणपूलांची गरज नसल्याच्या आय. आय.टी. पवईच्या अहवाला नंतर तत्कालीन मनपा आयुक्त मा. रमेश पवार यांनी दोन्ही उड्डाणपूल रद्द करण्याचे आदेश दिले आहे. स्थानिक नागरिकांच्या हितासाठी दिलेल्या लढ्याच्या यशाचा जल्लोष  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्रिमूर्ती चौक येथे पेढे वाटप करून साजरा केला.