Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरातील पंचवटी पोलीस स्टेशनच्या (Panchavati Police Station) पथकाला दुचाकी चोरीचा उलगडा करण्यास यश आले आहे. यात नाशिक शहरातून व ग्रामीण भागातून चोरी गेलेल्या दुचाकी चोरट्यांकडून 08 हस्तगत केल्या आहेत. नाशिक शहरातील १० गुन्हे उघडकीस आले आहेत.
पंचवटी पोलीस ठाणेकडील मोटार सायकल चोरीबाबत तपासा दरम्यान पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला नाशिक शहरात मोटार सायकलींची चोरी करून त्यांची ग्रामीण भागात विक्री करणारे दोन संशयित हे पंचवटी भाजीपाला मार्केट यार्डमध्ये येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने पंचवटी भाजीपाला मार्केट यार्ड येथे सापळा लावुन संशयित दिगंबर गंगाधर गांगोडे, किरण नामदेव पागे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सदर गुन्हयाचे अनुषंगाने नाशिक शहरामध्ये घडत असलेल्या इतर मोटार सायकल चोरीच्या गुन्हयांबाबत खाकीचा हिसका दाखविल्यानंतर संशयितांनी दुचाकी चोरी केल्याची कबुलीही दिली.
तसेच मागील दोन वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी नाशिक शहर व परीसरात मोटार सायकलींची चोरी करून, गाडयांचे कागदपत्र नंतर आणुन देतो असे सांगुन त्या ग्रामीण भागात विक्री केल्या असल्याचे सांगितल्याने पोलीस पथकाने त्याप्रमाणे एकुण 08 मोटार सायकली हस्तगत केल्या असुन त्यावरून मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. हे गुन्हे पंचवटी, आडगाव, मुंबई नाका, पेठ, ओझर, सिन्नर, बाऱ्हे या ठिकाणी दाखल झाले आहेत. दुसऱ्या एका प्रकरणात पंचवटी पोलीस स्टेशनमधील गुन्हे शोध पथकाने दोन विधीसंघर्शित बालकांकडुन सदर गुन्हयात चोरीस गेलेली सायकल व इतर 07 विविध कंपन्यांच्या 08 सायकली हस्तगत केल्याआहेत.
इतर गुन्हे उघड
नाशिक शहरातील गंगाघाट परिसरात सोनल मयुर वालझाडे यांचा मोबाईल भाजीपाला खरेदी करीत असतांना चोरीस गेला होता. पंचवटी पोलिसांना तापसादरम्यान या मोबाईलचा शोध लागला असून बाळु देवराम पारधी या संशयितांकडून मोबाईल हस्तगत केला आहे. तर दुसऱ्या गुन्हयात मनिशा विजयंत महाडीक या दशक्रिया विधी निमित्त गंगाघाट परिसरात आल्या असता त्यांनी बाजुला ठेवलेल्या पर्समधुन त्यांचा वनप्लस कंपनीचा मोबाईल चोरीस गेला होता. या गुन्हयाचे तपासा दरम्यान संशयित दिनेश अशोक राखपसरे याना अटक करून मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे. तर एका गुन्ह्यात पर्सची चोरी करण्यात आली होती. या पर्सच्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक महिला पर्समधून वस्तू चोरताना आढळून आल्यानंतर शोध घेतला असता संशयितांकडून पर्स हस्तगत केली आहे.