Nashik Crime : सध्या सोशल मीडियावर (Social Media) रील बनवून फेमस होण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र यामुळे अनेकदा हातात घातक शस्त्रांचा वापर करुन रील बनवण्याचे प्रकारही वाढले आहेत. अशातच नाशिकमधील (Nashik) एका 19 वर्षीय तरुणाला रील बनवणं चांगलंच महागात पडलं आहे. इन्स्टाग्रामवर हातात तलवार घेऊन स्वतःला दादा म्हणवणाऱ्या युवकाला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 


इंटरनेटवर असंख्य तरुणांमध्ये इन्स्टा रिल्सची (Insta Reels) खूप क्रेझ आहे. अनेक तरुण-तरुणी इन्स्टा रील्स बनवून सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. मात्र काहीवेळा असंवेदनशील रील्स बनवणे महागात पडण्याची शक्यता असते. नाशिकमध्ये असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. इन्स्टाग्रामवर हातात तलवार घेऊन स्वतःला दादा म्हणवून घेणं नाशिकमधील एका 19 वर्षीय तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे.


नाशिक शहरातील भारत नगरमध्ये राहणाऱ्या फैजान शेख या 19 वर्षीय युवकाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हातात तलवार घेऊन एक व्हिडीओ पोस्ट करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता. सायबर पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तपासचक्रे फिरवली. दरम्यान हा व्हिडीओ बघताच गुन्हे शाखा एकच्या पथकाने फैजानसह त्याने तलवार खरेदी केलेल्या सचिन इंगोले या 28 वर्षीय तरुणालाही अटक केली. या दोघांकडून एक तलवार आणि एक लोखंडी गुप्ती हस्तगत केली आहे.


तरुणाकडून तलवार हस्तगत


नाशिक शहर पोलीस उपआयुक्त गुन्हे यांनी नाशिक शहरात प्राणघातक शस्त्रे बाळगणाऱ्या संशयितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचे पथक कार्यरत असताना इन्स्टाग्रामवर रील्स बनवून चमकोगिरी करणाऱ्या संशयिताबत माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने घटनास्थळी जाऊन भारत नगर इथून फैजान नईम शेख याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक स्टीलची धारदार तलवार हस्तगत करण्यात आली आहे. तसेच त्यास आणखी घातक शस्त्रांबाबत विचारपूस केली असता त्याने संबंधित तलवार त्याचा मित्र सचिन शरद इंगोले याच्याकडून घेतल्याचे आणि त्याच्याकडे देखील घातक शस्त्र असल्याचे सांगितले. 


अवैध प्राणघातक शस्त्र आढळल्यास कारवाई : नाशिक पोलीस


नाशिक पोलिसांनी संबंधित युवकाचा तपास करुन त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक धारदार लोखंडी गुप्ती हस्तगत करण्यात आली आहे. संशयितांविरुद्ध मुंबईनाका पोलीस स्टेशन नाशिक शहर येथे लेखी फिर्याद दिल्यावरुन गुन्हा दाखल आला आहे. दरम्यान नाशिक पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, कोणीही अवैध प्राणघातक शस्त्रांचा वापर करु नये, असे आढळून आल्यास पोलिसांमार्फत कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच या प्रकरणी फैजानने ही तलवार नक्की का खरेदी केली होती? तसेच विक्रीसाठी सचिन तलवार कुठून खरेदी करतो? यांसह अधिक तपास पोलिसांकडून सध्या केला जात आहे. तरुणाईचा गुन्हेगारीकडे वाढता कल हा चिंतेचा विषय ठरत असून सोशल मीडियाचाही त्यांच्याकडून गैरवापर होत असल्याच या घटनेतून पुन्हा सिद्ध झालं आहे.