Nashik Accident : नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली असून नदीकाठावर सेल्फी काढणं एका युवतीला जीवावर बेतले आहे. नाशिक शहरातील सोमेश्वर धबधब्याजवळ (Someshwar Waterfall) ही घटना घडली आहे. मित्रांसमवेत फोटो काढताना पाय घसरला अन ही युवती थेट धबधब्यात पडली. यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला आहे.
नाशिक (Nashik) शहरातील सोमेश्वर धबधबा येथे मित्रांसमवेत फिरण्यासाठी आलेली युवती ही फोटो काढत असताना तिचा पाय घसरून ती नदीपात्रात पडल्यावर मृत्यू झालेला आहे. शिवांगी जयशंकर सिंह असं मयत मुलीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवांगी (Shivangi Singh) आणि तिचा मित्र आदित्य देवरे हे सोमेश्वर धबधबा येथे फिरण्यासाठी आलेले होते. त्यामुळे सोमेश्वर धबधब्याचे शुभांगी मित्रांसोबत फोटो काढत असताना तिचा पाय घसरला आणि ती तोल जाऊन गोदावरी नदीपात्रात पडली. यावेळी तिथे उपस्थित नागरिकांनी तिला नदीपात्रातून बाहेर काढून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केला असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केला. या प्रकरणी गंगापूर पोलिसांत अकस्मात प्रत्यक्ष नोंद करण्यात आली आहे.
सध्या उन्हासोबत आल्हाददायक वातावरण असल्याने अनेक पर्यटक पर्यटनस्थळावर गर्दी करू लागले आहेत. मात्र अशावेळी अनुचित प्रकार घडल्याचे नेहमीच ऐकतो. यासाठी पोलिसांकडून देखील अशा धोकादायक पर्यटनस्थळी गेल्यानंतर काळजी घेण्याचे आवाहन तसेच सूचना केल्या जातात. मात्र या सूचनांकडे पर्यटक सर्रास दुर्लक्ष करून आपल्या जी धोक्यात घालतात. असाच काहीसा प्रकार नाशिक शहरात घडला आहे. सिन्नर येथील काही मित्रांचा ग्रुप हा नाशिक शहरात फिरण्यासाठी आलेला होता. शहरातील सोमेश्वर धबधबा हा नेहमीच पर्यटकांचा आकर्षण ठरत आहे. मात्र अनेकदा सोमेश्वर धबधब्यावर फोटो काढतांना अनुचित प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
पाय घसरला अन् होत्याच नव्हत झालं..
दरम्यान, हा दोन तरुण आणि एक तरुणी असा तीन मित्रांचा ग्रुप सोमेश्वर धबधब्याजवळ पर्यटनासाठी आला होता. यावेळी धबधबा आणि परिसरातील निसर्ग सौंदर्य बहरले असल्याने त्यांनी फोटो काढण्यास सुरुवात केली. अशावेळी शिवांगी हिने उंचावर जाऊन सेल्फी घेण्याचे ठरविले. त्यानुसार ती धबधब्याच्या काठावर अलगद सरकत असताना थेट नदीत कोसळली. काही क्षणात स्थानिक नागरिकांनी धाव घेत तिला नदीबाहेर काढले आणि नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेने शिवांगीच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.