Year End 2022 : क्राईम कॅपिटल म्हणून ओळख निर्माण होऊ पाहत असलेल्या नाशिक शहरासह जिल्ह्याला गुन्हेगारीचा विळखा कायम आहे. कधी अत्याचार, खून, आत्महत्या आणि गँगरेप सारख्या अनेक घटना नाशिकमध्ये घडतात. याचबरोबर अलीकडच्या वर्षात शहरात सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. नाशिक शहरासह जिल्ह्याला हे वर्षही अतिशय भयावह राहिले.
एकीकडे कोरोनाची दोन वर्षे वेदनादायी गेल्यानंतर मात्र शहरात गुन्हेगारीने डोके वर काढले. अन सर्वसामान्य नागरिक देखील दहशतीखाली आले. खून, दरोडे, हल्ले, अपघात यामुळे हे वर्ष देखील नाशिककरांना भयावह गेल्याचे दिसून आले. सरत्या वर्षांचे अवघे दोन दिवस शिल्लक असताना देखील नाशिक शहरात गुन्हेगारीची परिस्थिती जैसे थे आहे. नाशिक शहरात वर्षाच्या सुरुवातच गुन्हेगारीने झाली अन् वर्षाच्या शेवटपर्यंत पोलिसांनी गुन्ह्यांच्या नवनव्या प्रकारांनी आव्हानच दिले.
वर्षभरात गुन्हेगारीत काय घडलं?
डॉ. सुवर्णा वाजे खून प्रकरण : नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या खून प्रकरणाने नाशिक शहरच नव्हे राज्यभरात चर्चेचा विषय ठरला. तपासाअंती डॉ. सुवर्णा वाजे यांचा पती संदीप वाजे यानेच खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
कापडणीस दुहेरी खून : मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस, त्यांचा मुलगा डाॅ. अमित यांची मालमत्ता हडप करण्यासाठी खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. कापडणीस यांचे शेअर्स विक्रीचे पैसे स्वत:च्या खात्यात वर्ग केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी राहुल जगतापला अटक केली. त्याने नानासाहेब यांचा गिरणारे शिवारात गळा आवळून खून केल्याचे समोर आले होते.
जरीफ बाबा मर्डर : ख्वाँजा सय्यद जरीफ अहमद चिश्ती ऊर्फ जरीफबाबा यांच्या खुनाची घटना घडली. नाशिक शहरासह राज्यभरात बहुचर्चित खुनाबाबत चर्चा झाली. जरीफ बाबाच्या नावावर भारतात करोडोंची मालमत्ता असल्याने त्याच्या साथीदारांनीच काटा काढल्याचे समोर आले होते.
वर्षभरात 27 खून
दरम्यान वरील महत्वाच्या खुनासह नाशिकमध्ये वर्षभरात 27 खुनाच्या घटनांची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक अल्पवयीन संशयितांचा समावेष असल्याचे समोर आले होते. त्याचप्रमाणे प्राणघातक हल्ला, मारहाण, अत्याचार, विनयभंग आदी घटना आजही राजरोसपणे घडत आहेत. एकूणच यंदाच्या वर्षात नाशिक आयुक्तालय व ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत सिने कथा प्रमाणे खून घडले आणि गुन्हेगारीचे नवे प्रकार पोलीस दलासाठी आव्हानात्मक ठरले.
बस अपघातात 13 जणांचा मृत्यू (08 ऑक्टोबर 2022)
नाशिककरांना हादरवून सोडणारा सरत्या वर्षातील भयावह अपघात म्हणून या बस पघाताची नोंद करता येईल. 8ऑक्टोबर रोजी नाशिक शहरातील औरंगाबाद रोडवरील मिरची चौफुलीवर भीषण अपघात झाला. पहाटेच्या सुमारास खासगी बसला झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले. पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातानंतर बसने पेट घेतल्याने संपूर्ण बस जळून खाक झाली. यामध्ये बारा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, अन्य एक जण उपचार सुरु असताना मयत झाला.
सिन्नर अपघात 5 मित्राचा मृत्यू (10 डिसेंबर 2022)
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील मोहदरी घाटात शुक्रवारी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पाच विद्यार्थ्यांवर काळाने घाला घातला. तर 4 जण जखमी झाले. कारचे टायर फुटल्याने कार लेन ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर आदळली आणि मोठी दुर्घटना घडली. लग्नावरुन परतत असणाऱ्या मित्र मैत्रिणींच्या कारवर काळाने घाला घातला. सरत्या वर्षातील नाशिक जिल्ह्यातील हा दुसरा भयानक अपघात होता.
वणी येथील ट्रॅक्टर अपघातात 5 जणांचा मृत्यू (2 जून 2022)
नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडाकडे जाणाऱ्या मार्गावर वणी-मार्कंडेय पर्वताच्या पायथ्याशी ट्रॅक्टर आणि चारचाकीचा भीषण अपघात झालाय. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ट्रॅक्टर उलटून अल्टो कारवर पडल्याने हा भीषण अपघात झाला होता. तर अपघातात 10 ते 15 जण जखमी झाले होते. हा अपघात देखील भीषण होता.
नाशिक शहरात नव्याने 22 सिग्नल प्रस्तावित आहेत. नाशिक शहरातील डिके नगर चौकी चार पोलिसांच्या ऑन ड्युटीमध्ये मद्य प्राशनामुळे शहरात 65 टपरीवाजा चौक्या असल्याचे चौकशीत समोर आले. नाशिकमध्ये सीबीआय एसीबीचे पहिल्यांदाच कामकाज सुरु झाले. पथकाने सीजीएसटीसह एमईएसईच्या अधिकाऱ्यांना अटक केली. 2013 मधील बाफना खून खटल्यात पाच पैकी तिघांना निर्दोष मुक्त करून संशयित चेतन पगारे आणि अमन भट यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयीन प्रकरणात बनावट दस्तऐवज आधारे 81 प्रकरणांमध्ये तोतया जामीनदार यामागील सक्रिय टोळी जेरबंद करण्यात आली. एकूणच नाशिक शहराची सध्याची परिस्थिती नाजूक असून अल्पवयीन मुलांच्या हाती शस्त्रे आले आहेत. अमली पदार्थांचा विळखा वाढला असून दरोडा, खंडणी गुंडागर्दी, प्राणघातक हल्ले नित्याचे झाले आहेत, आगामी नव्या वर्षात या सर्वांवर रोख लावणे नाशिक पोलिसांचे काम असणार आहे.