Nashik News : नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्याला लाचखोरीच्या (Briibe) घटनांनी अक्षरशः पोखरून काढले आहे. अशातच नाशिक महापालिकेतील (Nashik NMC) लाचखोर वरिष्ठ लिपिक प्रेमलता प्रेमचंद कदम यांना 500 रुपयांची लाच घेताना लाचलुचपात प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. 


गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये लाचखोरीचे प्रमाण वाढले असून दर दोन दिवसांनी लाचेचे एक ना एक प्रकरण समोर येत आहे त्यामुळे वर्षभरात नाशिकमध्ये हजारो लाच प्रकरण उघडकीस आले आहेत. या प्रामुख्याने पोलीस प्रशासन मनपा त्याचबरोबर इतर विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे दिसून येत आहे. अशातच आता वर्षाच्या शेवटी नाशिक मनपा कार्यालयातील महिला लिपिकाने लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रेमलता प्रेमचंद कदम असे या महिवाल लिपिकाचे नाव असून त्या महापालिकेच्या पश्चिम विभागात जन्म मृत्यू कार्यालयात कार्यरत आहेत. 


नाशिकच्या पंचवटी विभागात जन्ममृत्यू कार्यालयात प्रेमलता कदम या कार्यरत आहेत. या कार्यालयात हजारो नागरिकांचे येणे जाणे असते. नागरिकांसाठी महत्त्वाची असलेली कागदपत्रे या कार्यालयातून मिळत असतात. यामध्ये जन्माचा दाखला, मृत्यूचा दाखला या दाखल्यांचा समावेश होतो. दरम्यान एसीबीने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार व्यक्तीच्या नातीचा जन्म दाखला मिळावा म्हणून महापालिकेत अर्ज केला होता. हा दाखला देण्यासाठी संबंधित महिला लिपिकाने पाचशे रुपयांच्या लाचेची मागणी केली. अखेर तक्रारदाराने या प्रकरणी एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबीने पथक तयार करून सापळा रचला. पाचशे रुपयाची लाच घेताना महिला लिपिक एसीबीच्या जाळ्यात सापडल्या. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


नाशिकच्या अधिकाऱ्यांना झालंय तरी काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा लाचखोरीच्या घाटांमध्ये कमालीची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नाशिक विभागात मागील काही दिवसात अनेक अधिकारी एसीबीच्या जाळयात सापडले आहेत. त्यामुळे हे प्रमाण अत्यंत घातक असल्याचे दिसून येत आहे. सुरवातीला पोलीस प्रशासनाला लाचखोरीचे ग्रहण लागल्याचे दिसत होते. त्यानंतर नाशिकचे महावितरण पुढे येऊ लागले. आता नाशिक महापालिकेतील कर्मचारी लाच प्रकरणात जाळ्यात सापडले आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने अधिकारी वर्गच लाचखोर होऊन जनतेची लूट करत असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी कुणाकडे दाद मागायची असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.


संपर्क साधण्याचे आवाहन 
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन अँन्टी करप्शन ब्युरो, नाशिक विभागाकडून करण्यात आले आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यात पोलीस कर्मचारी, अधिकारी वर्गांमध्ये लाच घेण्याचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या वर्षभरात लाच लुचपत विभागाने अनेक पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. दरम्यान, कोणत्याही शासकीय अधिकारी वा कर्मचाऱ्याने किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्तीकडून कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.