Nashik District Bank : नाशिक जिल्हा बँकेच्या (Nashik District Bank) कर्ज वसुलीच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari sanghatana) आक्रमक झाली आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या घरावर स्वाभिमानी शेतकरी संघटना बिऱ्हाड मोर्चा काढणार आहे. मोर्चात माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) उपस्थित राहणार आहेत. 


नाशिक जिल्हा बँकेच्या वसुली विरोधात 16 जानेवारी रोजी भव्य  बिऱ्हाड मोर्चा काढण्यात येणार असून यामध्ये आता राजू शेट्टी यांनी सहभागी होण्याची माहिती दिली आहे. त्यासोबतच मोर्चा सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना देखील आवाहन केले आहे. केवळ सहभागी व्हायचं म्हणून होऊ नका तर जोपर्यंत या विषयाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार करा असे आवाहन राजू शेट्टी यांच्याकडून करण्यात आले आहे. दरम्यान नाशिक जिल्हा बँकेच्या वसुली विरोधात जिल्ह्यातील शेतकरी एकवटले आहेत. त्या पार्श्वभूमीवर 16 जानेवारीला नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या निवासस्थानावर शेतकऱ्यांकडून विराट मोर्चा काढत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


दरम्यान नाशिक जिल्ह्यात जिल्हा बँकेचे एकूण 62 भागीदार आहेत. या थकीत कर्जाची मुद्दल फेड करून घ्यावी, कर्जाचे पुनर्गठन करत गेल्याने शेतकऱ्यांची थकबाकी वाढत गेली आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी सरकारने अंदाजे 500 कोटी रुपयांची तरतूद करावी या मागण्यांसाठी शेतकरी विराट आंदोलनाच्या माध्यमातून एकत्र येणार आहेत. जिल्हा बँकेकडून कर्ज घेतलेल्या कर्जाची जुलमी वसुली जिल्हा बँकेकडून करण्यात येत आहे. याचबरोबर शेतकऱ्यांच्या वाहनांचा लिलाव, जमिनीचा लिलाव, जमिनीवर बोजे लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. वसुली दरम्यान दादागिरीचे प्रकार देखील वाढले आहेत. जिल्हा बँकेकडून कर्ज घेतलेल्या सर्वांना समान वागणूक देणे गरजेचे आहे. मात्र मोठ्या थकबाकी दाराबाबत काय कारवाई केली? असे आरोप करत या विरोधात 16 जानेवारीला आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. . 


राजू शेट्टी शेतकऱ्यांसोबत 
जिल्हा बँकेच्या जुलमी कारभाराविरुद्ध आता शेतकरी संघटेनचे राजू शेट्टी देखील आंदोलनात उपस्थित राहणार आहेत. जिल्हा बँकेच्या कर्ज वसुलीच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. जुलमी पध्दतीने  शेतकऱ्यांकडून वसुली केली जात असल्याचा संघटनेचा आरोप आहे. येत्या 16 जानेवारीला दादा भुसेंच्या घरावर बिऱ्हाड मोर्चा निघणार आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून आता आंदोलनात राजू शेट्टी देखील हजेरी लावणार असल्याची माहिती मिळते आहे.


वसुलीची धडक मोहीम 
नाशिक जिल्हा बँकेचा 2022-23 कर्ज वसुली हंगामात जिल्हा बँक शेती संदर्भातील कर्जाची कोटींची जुनी थकबाकी आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेने जिल्ह्यातील टॉप थकबाकीदारांची यादी देखील जाहीर केली होती. त्यानुसार नोंव्हेबरपासून वसुली सुरू करण्यात आली होती. यामध्ये अनेक तालुक्यात वाहनाचा लिलाव, जमिनीचा लिलाव आदी प्रकारे वसुली केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी एकवटले आहेत.