Nashik Year End 2022 : सरत्या वर्षाच्या अवकाळी पावसाने यंदा नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात धुमाकूळ घातला. 2022 या वर्षाच्या सुरवातीपासूनच अवकाळी पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पाडली. मार्च 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत पावसाळी हंगामासह अवकाळी पावसाने हजेरी लावून नाशिकच्या शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळवले. 


सगळ्या जगाला हादरवून सोडणारी कोरोनाची (corona) दोन वर्ष गेल्यानंतर आझादीच 2022 हे वर्ष होत. या वर्षात लोक घराबाहेर पडली. नोकरी, व्यवसाय शेतीकडे पुन्हा एकदा वळू लागली. शेती हा मुख्य घटक असलेल्या आपल्या देशात मात्र गेल्या काही वर्षात अवकाळी पावसाचे प्रमाण वाढत आहे. यंदाही हे प्रमाण जास्तीचे पाहायला मिळाले. दरम्यान नाशिक जिल्ह्याचा विचार करता नाशिकसह जिल्ह्यात सह्याद्री पर्वत रांगेत असल्याने पावसाने प्रमाण भरपूर आहे. मात्र त्याबदल्यात यंदा अवकाळी पावसाने वर्षाच्या सुरवातीपासून जिल्ह्यात हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांना कोरोनाच्या दोन वर्ष फटका बसलाच मात्र यंदादेखील पावसाने साथ दिली नाही. 


दरम्यान यंदाचा अधिक जिल्ह्यातील पाऊस बघितला तर जुन ते ऑक्टोबर याकाळात राज्यात अतिवृष्टी व सततच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. जिल्ह्यात अतिवृष्टी व सततच्या पावसाने 4 लाख 43 हजार 455 हेक्टरची हानी झाली. चालूवर्षी राज्याला अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने झोडपून काढले. यास नाशिक जिल्हाही त्याला अपवाद ठरलेला नाही. जिल्ह्यात ठिकठिकाणी ढगफुटीसदृश्य पर्जन्यासह सततच्या पावसाने हजेरी लावली. अनेक तालूक्यांमध्ये सरासरीच्या दीडपट ते दुप्पट पाऊस झाला आहे. त्याचा सर्वाधिक फटका शेतीपिकांना बसला. काही तालूक्यांमध्ये पावसाने अवघी शेतीच वाहून गेल्याने रब्बीचा हंगाम घेणे मुश्कील झाले. तर काही भागांमध्ये 15 -15 दिवस शेतात पाणी साचून राहिल्याने अवघा खरीप वाया गेला आहे. यामुळं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं बोलले गेलं. मात्र, अद्याप पहिलीच मदत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाली नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.


असा झाला पाऊस 
मार्च 2022 : नाशिक जिल्ह्यातील येवला परिसर. 09 मार्च 2022 : इगतपुरीत अवकाळी पावसाचा कहर. सिन्नर तालुक्यात पावसाचा तडाखा. 
एप्रिल 2022  : चांदवड तालुक्यासह मनमाडच्या काही भागात अवकाळीच्या सरी. 
सप्टेंबर 2022 : सिन्नर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. जिल्हा प्रशासनानं रेस्क्यू ऑपरेशन . 
ऑक्टोबर 2022 : नाशिक जिल्ह्यातील सर्व 15 तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. 
डिसेंबर 2022 : नाशिक जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी. 


जानेवारी 3.2 मिलीमीटर पावसाची नोंद 
मार्च 12.9 मिलीमीटर पावसाची नोंद 
जून ते सप्टेंबर : 1219.5 मिलीमीटर पावसाची नोंद 
ऑक्टोबर नोंव्हेबर डिसेंबर 192.5 पावसाची नोंद 


असे आहे नुकसान
यंदाच्या अवकाळी पावसामुळे मका, सोयाबीन, भात, भुईमुग, कापूस, कांदा, भाजीपाला, डाळींब, द्राक्ष, टोमॅटो, चिकू, बाजरी, तुर यासह अन्य पिके पाण्यात गेली. जुन ते ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसाने 2 हजार 544 गावांमधील पिकांना तडाखा बसला आहे. सर्वाधिक नुकसान जिरायती क्षेत्राचे झाले असून तब्बल 1 लाख 9 हजार 847 हेक्टरवरील पिके वाया गेली. तर 32 हजार 446 हेक्टरवरील बागायत क्षेत्र तसेच 1071 हेक्टरवरील बहुवार्षिक फळपिकांना या पावसाचा तडाखा बसला. दरम्यान अवकाळी पावसामुळे 2 लाख 77 हजार 694 शेतकऱ्यांच्या भरपाईसाठी प्रशासनाने 241 कोटी 18 लाख 18 हजारांची मागणी शासनाकडे केली. शेतकऱ्याला पुन्हा ऊभे करण्यासाठी 241 कोटीहून अधिक रक्कमेची आवश्यकता आहे. मात्र, शासनाकडून केवळ मदतीच्या घोषणांचा पाऊस पाडण्यात आला असून प्रत्यक्षात हाती रक्कम पडलेली नाही. त्यामूळे अगोदर निसर्गाच्या तडाख्यात सापडलेल्या शेतकऱ्याला आता शासनाच्या लालफितीच्या कारभाराचा फटका बसतो आहे.