Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला असून निफाड (Niphad) तालुक्यातील भारतीय सैन्य दलातील जवान जनार्दन उत्तम ढोमसे यांना जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) येथे कर्तव्यावर असतांना वीरमरण आले आहे. घटनेची माहिती मिळताच निफाडसह उगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 


दरम्यान कालच बागलाण तालुक्यातील जवान सारंग अहिरे यांना वीर मरण आल्यानंतर नाशिक जिल्ह्यावर हा दुसरा आघात आहे. निफाड तालुक्यातील उगाव येथील रहिवासी असलेले आणि मरळगोई खुर्द येथे रहाणारे भारतीय सैन्य दलातील जवान जनार्दन उत्तम ढोमसे यांना जम्मू काश्मीर येथे कर्तव्यावर असताना वीरमरण आले आहे. ढोमसे यांच्या कुटुंबीयांना फोनद्वारे ही माहिती मिळाली आहे. त्यामुळे उगाव, मरळगोई खुर्द या गावासह परिसरातील गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान आज सायंकाळी उशिरा त्यांचे पार्थिव उगाव गावी येणार असून उद्या सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 


निफाड तालुक्यातील उगांव येथील रहिवाशी उत्तम बाबुराव ढोमसे यांचे ते सुपूत्र आहेत. जनार्दन यांचे प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण हे उगांव येथे झाले होते. 12 वी नंतर जनार्दन हे भारतीय सैन्य दलात दाखल झाले. त्याआधी त्यांनी लातुर येथे भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी अकॅडमीत प्रवेश घेतला होता. 2006-07 मध्ये सर्वप्रथम कच्छभोज त्रिपुरा आसाम आणि आता जम्मू काश्मीर येथे सेवा बजावत होते. तीन वर्षानंतर त्यांची सेवा संपणार होती. त्यांचे वडील उत्तम बाबुराव ढोमसे व आई हिराबाई उत्तमराव ढोमसे हे शेती व्यवसायानिमित्त मरळगोई खुर्द येथे स्थलांतरीत झालेले आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, आजी-आजोबा तसेच पत्नी रोहीणी, मुलगा पवन (वय वर्ष 8), मुलगी आरु (वय वर्ष 2 ), भाऊ दिगंबर, चुलते व चुलती असा परिवार आहे. 


राष्ट्रप्रेमासाठी‌ स्वत: चे जीवन समर्पित करु‌न आमच्या ढोमसे परिवारातील युवकाने वीरमरण पत्करुन भारत मातेच्या चरणी आपले आयुष्य समर्पित केले आहे.  जनार्दनला लहानपणापासून देशसेवेची आवड होती. शिक्षण सुरू असताना त्याचा कल सैन्यदलाकडे होता. सेवा पूर्ण होण्यापू्र्वीच त्याला वीरमरण आले. 01 जानेवारीला तो घरी येणार होता, अशी माहिती जवान ढोमसे यांचे चुलते ज्ञानेश्वर ढोमसे यांनी सांगितले. 


नाशिक जिल्ह्यातील येवला, बागलाण, निफाड आदी तालुक्यात हजारो जवान देशसेवेसाठी कार्यरत असून कालच बागलाण तालुक्यातील सारंग अहिरे हा जवान आसाम राज्यात सीमेवर कार्यरत असताना शहीद झाला. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा निफाड तालुक्यातील एका जवान शहीद झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. जनार्दन ढोमसे असे या जवानांचे नाव आहे. जवान ढोमसे यांच्या निधनाने नाशिकसह निफाड तालुकाव उगाव आणि मरळगोई गावावर शोक व्यक्त करण्यात येत आहे.