Nashik Rain : नाशिकच्या पश्चिम पट्ट्यासह गंगापूर पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या मुसळधार पासवामुळे नाशिक (Nashik), त्र्यंबकेश्वर (Trambakeshwar), इगतपुरी (Igatpuri) परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणसाठ्यात वाढ झाली आहे. तर नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून 3000 क्युसेकने विसर्ग करण्यात आला असून हंगामातील हा पहिलाच विसर्ग आहे. 


नाशिक शहरासह जिल्ह्यात धुवांधार पाऊस सुरु असून यामुळे धरण साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे नांदुरमाध्यमेश्वर, पालखेड डॅमसह इतर काही धरणातून विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नाशिक पश्चिम पट्ट्यात सुरु असलेल्या पावसामुळे गंगापूरचा धरण साठा देखील वाढला आहे. यामुळे आज सकाळी अकरा वाजता गंगापूर धरणातून 3000 क्युसेक्सने विसर्ग करण्यात आला आहे. तर आज रोजी 1:00 वा. गंगापूर धरणातून 5500 क्युसेक्स विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. तर नाशिक जिल्ह्यातील धरण साठ्यात वाढ होऊन 47 टक्क्यांवर पोहचला आहे. 


जिल्ह्यातील संततधार पावसामुळे इगतपुरी व दिंडोरी तालुक्यातील धरणांमधील पाणी पातळी झपाट्याने वाढत असल्याने पुढे पुराचा कोणताही धोका नको यासाठी रविवारी सकाळी दारणा धरणातून 3000 क्यूसेस तर पालखेड धरणातून 5600 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यातच गोदावरी नदीपात्रासह नांदूरमध्यमेश्वर धरणात मोठ्या प्रमाणात पाणवेलींनी बस्तान बसविल्याने या पाणवेली काढून देण्यासाठी काल रविवार (दि.10) रोजी नांदूरमध्यमेश्वर धरणाचे सर्व आठ दरवाजे उघडण्यात येवून या दरवाजातून 6300 क्यूसेकच्या विसर्गाबरोबरच नदीपात्रातील व धरणातील पाणवेली देखील वाहून जावू लागल्या आहेत.


दरम्यान काल दुपारी 3 वाजेनंतर पालखेड व दारणा धरणातून सोडलेले पाणी नांदूरमध्यमेश्वरच्या दिशेने येत असल्याने या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. साहजिकच धरणातील पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येवून रात्री हा विसर्ग 10 हजार क्यूसेकपर्यंत करण्यात येणार आहे. मागील वर्षी नांदूरमध्यमेश्वर धरणातून 1 लाख क्यूसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता. साहजिकच पावसाचा जोर कायम राहिला तर नांदूरमध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येवू शकतो. मात्र, रविवारी दुपारच्या सुमारास 6300 क्यूसेकचा विसर्ग करण्यात आला होता. रात्री त्यात वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. धरणातून सोडण्यात येणार्‍या पाण्यामध्ये वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.


जिल्ह्यातील धरणसाठा 
जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे धरण साठ्यात वाढ झाली असून गंगापूर धरण (Gangapur Dam) आता 55 टक्के तर दारणा 67 टक्के भरले आहे. तर गौतमी गोदावरी 40, आळंदी 43, पालखेड 48, पुणेगाव 69, मुकणे 50, नांदूरमध्यमेश्वर 00, चणकापूर 44 अशी जिल्ह्यातील महत्वाच्या धरणातील टक्केवारी आहे. तर काही धरणांतून विसर्ग करण्यात येत आहे. यामध्ये दारणातून 4113 क्युसेक, नांदूरमध्यमेश्वरमधून 6300 क्यूसेक ने विसर्ग करण्यात येत आहे. नांदूरमध्यमेश्वर मधून आतापर्यंत 14409 क्युसेक पाणी वाहून गेले आहे. तर आज 12 वाजेपासून गंगापूर धरणातून 3000 क्युसेक्स पाणी सोडण्यात येणार आहे. तर आज रोजी दुपारी 1:00 वा. गंगापूर धरणातून  5500 क्युसेक्स विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात  येणार आहे