नाशिक: राज्यात जे काही कांड झालं त्यामागे ईडी असून अडीच वर्षे आता ईडीच्या कार्यालयाला कुलूप लावा, कारण आता तुमचं सरकार आलं आहे असा टोला छगन भुजबळांनी लगावला. प्रताप सरनाईक आणि यामिनी जाधव म्हणाले असतील, आता दिल्लीला गेलो आणि सुटलो रे बाबा असंही भुजबळ म्हणाले.
नाशिकमध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, "अडीच वर्षे आता ईडीच्या कार्यालयाला कुलूप लावा, कारण आता तुमचं सरकार आलं आहे. राज्यात जे काही कांड झालं, सत्तांतर झालं त्यामागे ईडी आहे. महाराष्ट्र सदनामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करुन मला जेलमध्ये टाकण्यात आलं. पण त्याविरोधात कोणताही पुरावा नव्हता. आता आपल्यातल्या काही मंत्र्यांना ईडीच्या नोटीसा आल्या होत्या. सरनाईक आणि यामिनी जाधव म्हणाल्या, आम्ही दिल्लीला गेलो, आता सुटलो, आमच्या केसेस माफ झाल्या."
आमच्यावर आरोप करताय, पण मला या आरोपांचे आता काहीही वाटत नाही असं म्हणज छगन भुजबळ यांनी शायरीच्या माध्यमातून आपली भावना मांडली. ते म्हणाले की, "बडी से बडी हस्ती मिट गयी हमे मिटाने मे, तुम चाहे कितनी भी कोशिश करलो, तुम्हारी उम्र बित जायेगी हमे मिटाने मे."
नरहरी झिरवाळ यांची टोलेबाजी
शिवसेनेची आताची अवस्था म्हणजे तोंड दाबून बुक्क्याचा मार अशी झाली आहे असं विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं. 11 तारखेला काय होईल हे मलाही सांगता येत नाही पण कायद्याप्रमाणे माझा निर्णय योग्य होता असंही ते म्हणाले.
नरहरी झिरवाळ म्हणाले की, "पक्षप्रमुखानं जो गटनेता बनवला त्याला बहुमताची गरज नसते. पण यांनी बहुमताच्या जोरावर गटनेता बदलला. पक्षनेता जो निर्णय घेतो त्याला आमदारांच्या संख्येची गरज नसते, कारण पक्ष वेगळा आणि आमदार वेगळे. मला 11 तारखेचं काही सांगता येत नाही. कायद्याप्रमाणे जर गेले तर माझाच निर्णय योग्य आहे. हे सगळं सुरू असताना मला मोठ्या साहेबांनी विचारलं होतं की, अरे तुझं काय होईल रे? तेव्हा एक जण म्हणे राज्यपाल आणि त्यांचे खूप चांगले जमते, त्यामुळे काही होणार नाही."