Nashik Apala Davkhana : राज्यातील गोरगरिबांना मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने आपला दवाखाना (Apala Davakhana) नावाची योजना सुरू केली आहे. रुग्णांना दुपारी दोन वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत तपासणी (Health Checkup) करता येणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक रुग्णाची तपासणी व त्यावर मोफत उपचार सोय असून या रुग्णालयातून 147 प्रकारच्या तपासण्या करण्यात येणार असल्याचे समजते.
राज्यातील विविध जिल्ह्यात शिंदे फडणवीस (Eknath Shinde) सरकारच्या माध्यमातून आपला दवाखाना हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातही प्रत्येक तालुक्यात आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत रुग्णांची बाह्य तपासणी केली जात आहे. मुळात काही ठिकाणी ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय व मनपाचे रुग्णालय असल्यामुळे आपला दवाखान्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालय किंवा महसूल प्रमुख गावांमध्ये एक याप्रमाणे आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे. नाशिक शहरात देखील महापालिकेच्या (Nashik Mahapalika) पुढाकाराने दवाखाना सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या विविध भागात प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते उपजिल्हा रुग्णालयापर्यंत आरोग्य सुविधा देण्यात येत असतात. मात्र महाराष्ट्र सरकारने आपला दवाखाना ही वेगळी संकल्पना लोकांच्या सुविधेसाठी आणली आहे. ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना या ठिकाणी मोफत तपासण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आल्याने रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांनी सांगितले आहे.
पंधरा तालुक्यांत आपला दवाखाना
दरम्यान नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात आपला दवाखाना सुरू झाला आहे. यामध्ये नाशिक शहरातील चुंचाळे अंबडगाव, बागलाण तालुक्यातील पिंपळेश्वर, चांदवड तालुक्यातील दोन जुने तहसील कार्यासमोर, देवळा तालुक्यातील दोन उपकेंद्रा शेजारी, दिंडोरी तालुक्यातील एक उपकेंद्रा शेजारी, इगतपुरी तालुक्यातील गिरणारे केंद्र, कळवण तालुक्यातील तीन उपकेंद्र, मनमाड शहरातील डॉ आंबेडकर चौक परिसरात, निफाड तालुक्यातील दोन उपकेंद्रजवळ, पेठ तालुक्यातील जुना पंचायत हॉल शेजारी, सिन्नर तालुक्यातील जुना पालिका दवाखाना जवळ, सुरगाणा तालुक्यात जुने तहसील क्वार्टरजवळ, त्र्यंबक शहरातील त्र्यंबकेश्वर तहसील कार्यालयाजवळ तर येवला तालुक्यातील वल्लभनगर परिसरात आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे.
जवळपास 147 प्रकारचा मोफत तपासण्या
आपला दवाखाना योजनेत जवळपास 147 प्रकारच्या तपासण्या मोफत करण्यात येत असून मोफत औषधोपचाराच्या सोयी करण्यात आल्या आहे. याशिवाय या दवाखान्यात नियमित लसीकरणही करण्यात येत आहे. आपला दवाखाना या योजनेत फक्त रुग्णाची तपासणी करण्यात येणार असल्याचे म्हटले जात असले तरी अशा दवाखान्यात गरजेनुसार फिजिशियन, स्त्रीरोग व प्रसूती रोगतज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोगतज्ञ, त्वचारोगतज्ञ, मानसोपचारतज्ञ, कान, नाक, घसातज्ञ या डॉक्टरांना देखील पाचारण करण्याची सोय आहे. या दवाखान्यातून बाहेरून सेवा मोफत औषधोपचार, टेली कन्सल्टेशन महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, एक्स-रे साठी संदर्भ सेवा, गर्भवती मातांची तपासणी व लसीकरण केले जाते.