Nashik Puranpoli : खापरावरची पुरणपोळी (Khapar Puranpoli) म्हटली कि जळगाव जिल्हा किंवा कसमादे पट्टा हे समीकरण सर्वानाच तोंडपाठ आहे. खान्देशात (Khandesh) फेमस असलेल्या पुरणपोळीचा अवघ्या महाराष्ट्रानं आस्वाद घेतला. मांडे बनविणाऱ्या महिलांच्या हाताला एक वेगळीच चव असते. त्यामुळे महिलांसारखंच मुलीदेखील मांडे बनविण्यास तरबेज असल्याचे दिसते. नाशिकच्या (Nashik) देवळा (Deola) तालुक्यातील इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या देवयानीने सर्वानाच भुरळ घातली आहे. देवयानीच्या खापरावरचे मांडे म्हणजेच पुरणपोळी बनवतानाचा विडिओ सध्या सोशल मीडियावर (Viral Video) व्हायरल होतो आहे. 


कसमादे पट्टा म्हणजे चविष्ट भरताची वांगी, कळण्याची भाकरी आणि खापरावरची पुरणपोळी... अवघ्या महाराष्ट्राच्या जिभेवर खापरावरचे मांडे म्हणजे पुरणपोळीची चव रेंगाळतेच. यासाठी हातावर तयार केलेली मोठाली पुरणपोळी करण मोठं जिकिरीचं काम असत. आणि ती सहजपणे तव्यावर टाकणं हे कौशल्याचं काम असतं. हेच कौशल्य आत्मसात केले आहे देवळा तालुक्यातील माळवाडी या गावात राहणाऱ्या देवयानी भदाणे या गोड मुलीने. इयत्ता पाचवीत शिकणारी देवयानी सुंदररित्या खापरावरची मांडे बनवत असल्याचा विडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


माळवाडी येथील दावल भदाणे व दिनू भदाणे यांच्या घरातील हि मुलगी. भदाणे यांचा केटरिंगचा व्यवसाय असून ते अनेक वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. यांची मुलगी देवयानी हि जिजामाता कन्या विद्यालयात पाचवीच्या वर्गात शिकते. घरात आईसह वडिलांचा केटरिंगचा व्यवसाय असल्याने तिला स्वयंपाकाचे बाळकडू घरातूनच मिळत आहे. यातूनच तिला आवडही निर्माण झाली. ती गेल्या काही दिवसांपासून खापरावरची मांडे बनवण्यास शिकते आहे. आणि आता कुणालाही लाजवेल असे मांडे ती स्वतः बनवत असते. शिवाय तिने तयार केलेल्या पुराणपोळीला विशेष चव असल्याचे कुटुंबीय सांगतात. 


जेवणाची हॉटेल संस्कृती
आजच्या जेवणाची हॉटेल संस्कृती अस्तित्वात आल्याने घरचे जेवण विसरूनच गेले आहेत. त्यातच खान्देशी जेवण संस्कृती तर अवघ्या महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध आहे. येथील खापरावरचे मांडे आजही प्रचलित आहेत. खापरावरचे मांड्याचे जेवण तयार करणे म्हणजेच महिला वर्गाची खासियत आहे. पुरणपोळीचा स्वयंपाकासाठी अत्यंत आवश्यक असलेले खापर आता नामशेष होण्याच्या मार्गावर आले आहे, मात्र तरी देखील ग्रामीण भागातील काही महिला आजही हि परंपरा जपून आहेत. 


असे बनवितात खापरावरचे मांडे 
खापरावरचे मांडे तयार करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे गहू धुणे, वाळवणे, जात्यावर दळणे, पातळ कापडावर चाळणे, यातून तयार झालेल्या पिठाची कणिक बनवणे, कणकेच्या योग्य आकारमानाच्या पोळ्या लाटून त्यात शिजवलेली हरभरा डाळ व गुळ एकत्र करून टाकतात. त्यानंतर मोठ्या कौशल्याने खापरावर मांडे बनविले जातात.