Nashik News : नाशिककरांना (Nashik) ये जा करण्यासाठी मनपा प्रशासनाने सुरु केलेली सिटी लिंक (Citylink Bus) बस सेवा मागील वर्षी तोट्यात गेली. हा तोटा भरून काढण्यासाठी मनपा प्रशासनाने (Nashik NMC) अनोखी योजना आणली आहे. नाशिकच्या रस्त्यावरील सिटीलिंकच्या स्टॉपला स्थानिक दुकानांची नावे देता येणार आहेत. या माध्यमातून आर्थिक तोटा भरून काढला जाणार आहे.
नाशिककरांना सुखकर, आरामदायी, सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या वतीने नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. (सिटीलिंक) कंपनी स्थापन करण्यात आली. 08 जुलै 2021 रोजी नाशिककरांच्या सेवेत सिटीलिंकची बस प्रत्यक्षात रस्त्यावर धावली. 2021-22 या आर्थिक वर्षात सिटीलिंकला 11.13 कोटी रूपयांचा तोटा झाला. परंतु हा तोटा आणखी कमी करण्यासाठी सिटीलिंकच्या वतीने विविध योजना आखण्याचा निर्णय झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
मंगळवारी नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. संचालक मंडळाची 12 वी बैठक महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवन याठिकाणी पार पडली. सिटीलिंकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकी प्रसंगी नाशिक महानगरपालिकेचे मुख्य लेखा परीक्षक बोधिकिरण सोनकांबळे, मुख्य लेखापाल व वित्त अधिकारी नरेंद्र महाजन, नाशिक स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, राज्य महामार्ग परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक मुकुंद कुंवर हे संचालक तसेच सिटीलिंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी चव्हाणके उपस्थित होते. सिटीलिंक बससेवा सुरळीत रस्त्यावर धावावी यासाठी नाशिक महानगरपालिकेला दरमहा 5 कोटी रुपये सिटीलिंकला अदा करावे लागतात. परंतु आता दरमहा बसणारी ही आर्थिक झळ कमी करण्यासाठी सिटीलिंक ने उत्पन्न देणार्या उपाय योजना आखण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या.
यामध्ये बसच्या आत डिजिटल व बाहेर जाहिरात करणे, सिटीलिंक ची तपोवन बसस्थानक येथील गाळे भाडेतत्वावर देणे, महापालिकेच्या जागेवरील बस डेपो याठिकाणी सीएनजी पंप लावणे, बस स्टॉप जाहिरात अशा विविध उपायांवर यावेळी चर्चा करण्यात आली. सर्वात अनोखी योजना म्हणजे बस स्टॉपला नाव देणे. यामध्ये बस स्टॉप जवळील एखादा दुकानदार किंवा अन्य एजन्सी इच्छुक असल्यास सदर दुकानाचे किंवा एजन्सीचे नाव बस स्टॉपला देणे व त्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न वाढविणे. अशा विविध उपाययोजना करण्याचा निर्णय 19 जुलै रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
याशिवाय तिकीट तपासणी व दंड वसुलीकरिता निविदा काढणे व जी एजन्सी जास्त शेअरिंग देणार त्या एजन्सीची तिकीट तपासणी व दंड वसुलीकरिता नेमणूक करण्याच्या सूचना देखील यावेळी अध्यक्ष रमेश पवार यांनी दिल्या. सध्यस्थितीत अत्याधुनिक सुविधा, आरामदायी प्रवास यामुळे नाशिककरांची सिटीलिंकला पसंती मिळत आहे. परंतु आता प्रवाशांचे मन जिकतांनाच आर्थिक तोटा टाळण्यासाठी देखील आता सिटीलिंक अधिकाधिक प्रयत्न करणार आहे.