Nashik Satyajeet Tambe : राज्याचे (Maharashtra) चित्र चिंताजनक असून इथे सर्व जाती धर्माच्या नावावर सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची आपली परंपरा आहे. या परंपरेला गालबोट लागणार नाही याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. मात्र सद्यस्थितीत तरुणांचा वापर राजकीय स्वार्थासाठी सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे. मात्र तरुणांनी आता जागे व्हावे, चांगेल काय, वाईट काय ते बघावे, असे आवाहन आमदार सत्यजीत तांबे यांनी केले आहे. 


नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. जिल्हा परिषदेत शिक्षकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात बैठक घेतल्यानंतर त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. यावेळी शिक्षण विभागात बोकाळलेला भ्रष्टाचार ते जाती धर्माच्या नावाने सुरु असणाऱ्या हिंसक आंदोलनात तरुणांचा सहभाग अशा विविध विषयांवर आपली मतं व्यक्त केली. सर्वच राजकीय पक्षांनी तरुणांचा राजकारणासाठी वापर केल्याचा आरोप सत्यजीत यांनी केला असून तरुणांनी भरकटत न जाता, जागे व्हावे, चांगले वाईट ओळखावे असे आवाहन केले आहे. 


सत्यजीत तांबे यावेळी म्हणाले की, संगमनेरसह कोल्हापूरला (Kolhapur) झालेला प्रकार निंदनीयच आहे. मात्र, तरुणांचा वापर स्वार्थासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून केला जात आहे. औरंगजेबाचे (Aurangjeb) फोटो अचानक झळकण्याला राजकीय वास असून अशाप्रकारचे प्रयोग हे कर्नाटक निवडणुकीपूर्वी झालेले आहेत. राजकारण्यांनाच फायदेशीर असतात, हे लक्षात घेऊन युवकांनीच असे प्रकार रोखणे आवश्यक असल्याचे मत नाशिक पदवीधर आमदार सत्यजीत तांबे यांनी साधलेल्या संवादात व्यक्त केले. राज्यात सध्या घडत असलेल्या घडामोडी पाहता महाराष्ट्राच्या प्रतिमेला, परंपरेला गालबोट लागू नये, यासाठी तरुणांनीच दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. 


तरुणांनो भरकटू नका, जागे व्हा...


तसेच कर्नाटक निवडणुकीपूर्वी (Karnatka Election) देखील अशाच स्वरूपाचे काही प्रकार घडले होते. औरंगजेब हा काही आताच लोकांना माहित झालाय का? मग आताच त्याचे फोटो का झळकू लागले आहेत, त्याचा विचारदेखील तरुणाईने करणे आवश्यक असल्याचेही तांबे यांनी नमूद केले. तरुणांचा वापर राजकीय स्वार्थासाठी सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे. या देशातील बेरोजगारी वाढत असताना त्याची चर्चा करायची सोडून अनावश्यक विषयांकडे भरकटत नेला जातो. त्यामुळे तरुणांनी भरकटत न जाता, जागे व्हावे, चांगले वाईट ओळखावे असे आवाहन केले आहे. 


शिक्षण आयुक्तांची भूमिका घेणे स्वागतार्ह 


शिक्षण विभागाचा कारभार 20 ते 25 वर्षांपासून चर्चेत आहे. शिक्षक इतर कामात गुंतत चालला आहे. त्यामुळे शैक्षणिक दर्जा सोडून इतर कामात व्यस्त आहेत. शिक्षण आयुक्तांनी शिक्षकांची चौकशी करावी, याबाबत पत्र दिले, ही अवस्था चिंताजनक आहे. शिक्षण-आरोग्य हे देशाचा कणा आहे. यात भ्रष्टाचार नको, तर शासनाने पैसे टाकले पाहिजे. शिक्षण आयुक्तांची भूमिका स्वागतार्ह आहे, यातून अनेक गोष्टी बाहेर पडतील. महसूल-पोलीस विभागात एखादा दोषी असतो, त्यामुळे तो वाचण्यासाठी पैसे देतो. इथे तर शिक्षकांना स्वतःच्या हक्काचे काहीतरी घेण्यासाठी पैसे द्यावे लागतात, हे तर अजब चालू आहे. शिक्षण आणि आरोग्य या दोन क्षेत्रामध्ये भ्रष्टाचाराची वाढलेली व्याप्ती, थेट रेटकार्ड जाहीर होणे त्रासदायक असल्याचेही तांबे यांनी सांगितले.