Nashik News : सोशल मीडियावरील (Social Media) वादग्रस्त पोस्टमुळे राज्यातील वातावरण बिघडले असून प्रशासनाकडून कठोर कारवाईचे आदेश देण्यात आलेले आहेत. अशातच नाशिक (Nashik) जिल्ह्यातील एका तरुणाला फेसबुकवर (Facebook) वादग्रस्त पोस्ट टाकणं महागात पडलं आहे. त्याचबरोबर नगर जिल्ह्यातील दोघांना वादग्रस्त पोस्ट प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाचे (Aurangzeb) पोस्टर आणि स्टेटस ठेवल्यामुळे राज्यभरात आंदोलनं (Protest) करण्यात आली. यामुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. खबरदारी म्हणून नाशिक पोलिसांनी (Nashik Police) नागरिकांना समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील, असा कोणताही मजकूर प्रसारित करु नये असे आवाहन केले आहे. मात्र याच दरम्यान घोटी येथील एका तरुणाने दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशी पोस्ट टाकल्यामुळे त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर घोटी शहरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र घोटी आणि इगतपुरी पोलिसांनी (Igatpuri Police) कुठलाही अनुचित प्रकार होऊ न देता परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे.


दुसरीकडे औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्यामुळे अहमदनगर (Amhednagar) जिल्ह्यातील कर्जत आणि मिरजगाव या ठिकाणी देखील तणावाचे वातावरण निर्माण झाल्याची समजते आहे. या पार्श्वभूमीवर एका तरुणाला ताब्यात घेतले असून एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ मिरज गावात गुरुवारी बंद पाळण्यात आला. मिरजगाव येथील एका तरुणाने सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्यानंतर गावातील वातावरण तणावाचे झाले होते. अशातच काही हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी संशयित तरुणाला पकडून ठेवत पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर गुरुवारच्या दिवशी बंद पाळण्यात आला. तर श्रीगोंदे शहरात काही तरुणांनी सोशल मीडियावर औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे व्हिडिओ टाकले. त्यामुळे देखील वातावरण तापल्याचे दिसून आले. यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत संबंधित तरुणाला वेळी ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या तरुणाविरुद्ध श्रीगोंदे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


घोटीतील तरुणाची वादग्रस्त पोस्ट


घोटी शहरातील एका तरुणाने सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकली. पोलिसांच्या निदर्शनास येतात, पोलीस कर्मचाऱ्यांनी फिर्याद दाखल करत घोटी पोलीस ठाण्यास संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यावरुन काही काळ घोटी येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घोटी पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांची मोठी गर्दी केली होती. मात्र घोटी आणि इगतपुरी पोलिसांनी कुठल्याही अनुसूचित प्रकार होऊ न देता परिस्थिती नियंत्रणात ठेवले आहे. या घटनेनंतर घोटी शहरातून पोलिसांनी रुट मार्च काढत नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या आपत्तीजनक पोस्ट ठेवू नये आणि अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.