Sant Nivruttinath Palkhi : तुका म्हणे माझे, हेचि सर्व सुख, पाहीन श्रीमुख आवडीने', विठ्ठलाच्या पायी मी तर झाले भाग्यवंत' अशा असंख्य भक्तिगीते आणि अंभगांनी पंढरीची वारी दुमदुमून गेली आहे. अशातच संत निवृत्तीनाथांची पालखी (Sant Nivruttinath Palkhi) नगर जिल्ह्यात प्रवेश केला असून कालच्या पारेगाव मुक्कामानंतर दिंडीने गोगलगावकडे प्रस्थान केले आहे. तर काल देऊळगाव मही इथे मुक्कामी असलेली मुक्ताबाईंची पालखीचं आज सकाळी देऊळगाव राजाकडे प्रस्थान झाले आहे. 


संत मुक्ताबाईंसह (Sant Muktabai) संत निवृत्तीनाथांची पालखी 2 जून रोजी निघालेली असून हजारो वारकऱ्यांचा पायी प्रवासाचा आजचा सातवा दिवस आहे. दातलीच्या रिंगणानंतर संत निवृत्तीनाथांची पालखी खंबाळे (Khambale) येथे मुक्कामी होती. त्यानंतर पालखी खंबाळेहून निघून पुढे पारेगावला विसावली होती. आज पारेगावहून संत निवृत्तीनाथांची पालखी पुढे मार्गस्थ झाली आहे. याबरोबर दिंडीने अहमदनगर (Ahamednagar) जिल्ह्यात प्रवेश केला आहे. आज पारेगावहून निघून पुढे संगनमनेर तालुक्यातील काकडवाडी मार्गे गोगलगावकडे मुक्कामी प्रस्थान करणार आहे. 


पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक विविध दिंड्यांच्या माध्यमातून पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. यात जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून निघालेली संत मुक्ताबाईंची पालखी काल देऊळगाव मही येथे मुक्कामी होती. आज पालखीचा सातवा दिवस असून देऊळगाव महीवरून दिंडी पुढे मार्गस्थ झाली आहे. तर दुपारी आळंद या गावातील गणपती मंदिरात दुपारच्या विसावा घेणार आहे. पुढे टाकरखेड भागिले या गावी विष्णू देशमुख आणि रामप्रसाद ताठे यांच्या वतीने दिंडीला दुपारचे जेवण देण्यात येणार आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे मुक्कामी असणार आहे. 


आज पालख्यांचा मुक्काम कुठे?


संत निवृत्तीनाथांची पालखी आज पारेगाव येथून पायमार्गाने काकडवाडी, तळेगाव, वडझरी, खु. लव्हारे कासारे या गावावरून जाणार आहे. तर दुपारचे जेवण तळेगाव गावी होणार आहे. तर मुक्कामासाठी संत निवृत्तीनाथांची दिंडी गोगलगाव येथे जाणार आहे. संत मुक्ताबाईंची पालखी आज देऊळगाव मही येथून आळंद गावामार्गे देऊळगाव राजाकडे मार्गक्रमण करणार आहे. या दरम्यान टाकरखेड भागिले या गावी विष्णू देशमुख आणि रामप्रसाद ताठे या ग्रामस्थांकडून दिंडीला दुपारचे जेवण दिले जाणार आहे. त्यांनतर दिंडीचे मुक्कामाचे ठिकाण देऊळगाव राजा या गावी असणार आहे. 


दातलीचे रिंगण पार पडलं! 


निवृत्तीनाथांच्या पालखीतलं पहिलं गोल रिंगण सिन्नर जवळील दातली येथे पार पडले. वारकऱ्यांच्या मोठ्या उत्साहात हा नयनरम्य सोहळा पार पडला. हजारो वारकऱ्यांनी यावेळी हरिनामाच्या गजरात, टाळ मृदुंगाच्या तालात फेर धरत गोल रिंगण लक्ष लक्ष डोळ्यांनी अनुभवले. तर संत मुक्ताबाई आषाढी पालखीने आतापर्यंत सहा दिवसात 120 किलोमीटरहून अधिक किलोमीटरचे अंतर पार केले आहे. तब्बल 600 किमीचा पायी प्रवास असून 25 दिवसांत राज्यातील सहा जिल्ह्यांतून मार्गस्थ होत मुक्ताई पालखी दिंडी पंढरपुरात दाखल होते. सर्वात लांब पल्ल्याची मुक्ताबाईंची दिंडी ओळखली जाते.