Nashik Water Crisis : यंदा पाऊस लांबला असल्याने नाशिक (Nashik) शहरासह जिल्हा पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे धरणातील पाणी पातळी (Dam Storage) देखील कमी झाली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिककरांनो पाणी जपून वापरा असे भावनिक आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
राज्यात मान्सूनचं आगमन झालं असलं तरी मान्सून हळूहळू पुढे सरकत आहे. राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस होताना दिसत आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आ वासून आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. परिणामी नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अद्यापही जोरदार पाऊस झालेला नाही. तर नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण साठ्यातही घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि, 'पिण्याच्या पाण्याचे आरक्षण ठेवून इतर पाणी इतरांना द्यायला सांगितले आहे. सद्यस्थितीत धरणांत पाणी साठा कमी आहे, त्यामुळे पिण्याच्या पाण्याची नासाडी होता कामा नये, तुम्ही आम्ही, नाशिककरांनी याची काळजी घेणं आवश्यक आहे. पाणी जपून वापरा हे मी नेहमी सांगतो, कारण तज्ज्ञ वेळोवेळी येऊन इतका धरण साठा आहे, तितका धरण साठा आहे, त्यामुळे नियोजन करणे आवश्यक आहे. पाऊस हल्ली वेळेवर येतोच असं नाही, पाण्याची कमतरता जाणवणार नाही अशी काळजी घ्या, त्यासाठी पाणी जपून वापरा असे आवाहन त्यांनी यावेळी नाशिककरांना केले.
नाशिकवर पाणी कपात
सध्या नाशिकसमोर पाणीप्रश्न उभा ठाकलाय. पावसाळा सुरू झाला मात्र अद्यापही नाशिक जिल्हा दमदार पावसाच्या प्रतीक्षेतच आहे. जिल्ह्यातील धरणसाठ्यात देखील दिवसेंदिवस घट पाहायला मिळते आहे. पाण्याची कमतरता भासेल अशी परिस्थिती होण्याआधीच पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नागरिकांना केलं आहे. नाशिक शहराची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणात ३८टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस वाढल्याशिवाय धरणाची पातळी वाढण्यास सुरुवात होणार नाही. त्यामुळे नाशिककरांसमोर पाणी कपातीचे संकट उभे ठाकले आहे.
शेतकरीही चिंतेत
नाशिक जिल्ह्यात पावसाने आतापर्यंत मालेगाव,नांदगाव व चांदवड या तालुक्यांमधील काही भागात हजेरी लावली असल्याने या ठिकाणी खरीप पूर्व मशागतीला अल्प प्रमाणात सुरुवात झाली आहे. मात्र,त्या तुलनेत जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात नाशिक तालुक्याश इगतपुरी, त्र्यंबकेश्वर,सुरगाणा या अधिक पावसाच्या भागासह सुरगाणा,निफाडझ येवला या तालुक्यात मात्र अत्यल्प पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.