Nashik Crime : गेल्या काही दिवसांपासून नाशिक (Nashik) शहरात गुन्हेगारी वाढली असून नाशिक पोलीस (Nashik Police) देखील आता आक्रमक झाले आहेत. अंबड पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर आता देवळाली पोलिसांनी देखील चांगली कामगिरी केली आहे. घातपाताच्या प्रयत्नात असलेल्या तिघा संशयितांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. 


नाशिकरोड भागातील देवळाली कॅम्पच्या विजय नगर राहणाऱ्या सहा युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दोन गावठी कट्ट्यासह तीन जिवंत काडतुसे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान काही दिवसांपासून पोलिसांकडून धाडसी कारवाया सुरु असल्या तरी गुन्हेगार मोकाट फिरत आहेत, हे अशा घटनांवरून दिसून येते. साधारण पंचवीस वर्ष वय असलेल्या या तरुणांबाबत देवळालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंदन जाधव यांना गोपनीय माहिती मिळाली होती.  


दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार गोपनीय पथक तयार करीत घटनास्थळी रवाना झाले. त्यावेळी विजयनगर परिसरात पाच ते सहा युवक गावठी कट्ट्यांसह सम्राट हॉटेलसमोर येथे येणार असल्याचे समजताच घटनस्थळी रवाना झालेल्या पथकाने सापळा रचला. या दरम्यान रात्रीच्या सुमारास संशयास्पद रित्या फिरताना हे तरुण आढळले. या सहाही युवकांची झाडाझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात दोन गावठी कट्टे व तीन जिवंत काडतुसे तसेच 53 हजार रुपये रक्कम आढळून आली. 


रात्रीचे गस्तीपथक कार्यान्वित 
देवळाली कॅम्प पोलीस ठाणे कडील रात्रगस्ती अधिकारी व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांना सदर ठिकाणी जावून बातमीची शहानिशा करण्याचे व कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन कडील रात्रगस्त अधिकारी श्री. लियाकत पठाण व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार, भगूर पोलीस चौकीचे अंमलदार व बिट मार्शल्स, पोलीस स्टेशन कडील सर्व पेट्रोलींग मोबाईल मधील अंमलदार यांनी बातमीतील ठिकाणी तात्काळ पोहोचून व सम्राट हॉटेल येथे सापळा रचून संशयीत इसमांना ताब्यात घेतले. 


अंबड पोलिसांची कामगिरी, 14 गुन्हे उघडकीस
नाशिकच्या अंबड पोलिसांनी 14 घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल केली आहे. यात 13 घरफोडीचे गुन्हे हे अंबड पोलीस स्टेशन हद्दीतील आहे तर 1 सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. या घरफोडी च्या गुन्ह्यातील एका मुख्य संश्यीता सह 2 साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अंबड पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिन्ही सराईत गुन्हेगार असून जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला हे तिघेही संशयित हवे आहेत. तर त्यांनी यापूर्वी अंबड, सातपूर पोलीस स्टेशन हद्दीत 14 गुन्हे केले आहेत. तर अंबड, इंदिरानगर, लासलगाव, गंगाखेड, उस्मानाबाद शहर, उस्मानाबाद बेंबळी आदी ठिकाणच्या पोलीस स्टेशनमध्ये या संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल असल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.