Nashik Water Tankers : राज्यात मान्सूनचं आगमन झालं असलं तरी मान्सून हळूहळू पुढे सरकत आहे. राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस होताना दिसत आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आ वासून आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. तर जिल्ह्यातील काही भागात आजही पाणी टंचाई जाणवत असल्याने पाणी टँकरची संख्या वाढली आहे. 


दरम्यान राज्यातील मुंबई, ठाणे, पालघरसह पुणे, सांगली, वाशिम, यवतमाळ, सिंधुदुर्ग, बुलढाणान या जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं लवकरच खरीपाच्या पेरणीला सुरुवात होणार आहे. मात्र नाशिक जिल्ह्यात पुरेसा पाऊस नसल्याने पाणीटंचाई वाढली असून टँकर ची संख्या देखील वाढली आहे. गतवर्षी या कालावधीत पावसाला सुरुवात झाल्याने टँकर्सची संख्या घसरली होती. यंदा मात्र पाऊसच न झाल्याने टँकर्सची संख्या दुपटीने वाढली असल्याचे चित्र आहे.


नाशिकच्या सिन्नर, येवला, चांदवड, देवळा आदी भागात जोरदार पावसाने हजेरी लावली तर इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ सुरगाणा आदी तालुक्यात अद्यापही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे टँकर देखील वाढले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ८४ टँकर्स सुरू आहेत. गतवेळी जूनच्या पंधरवड्यापर्यंत पावसाचे आगमन टँकरची संख्या कमी होऊन ४१ पर्यंत खाली आली होती. सद्यस्थितीत २५२ वस्ती व वाड्यांची टँकरने तहान भागवली जात आहे. जिल्ह्यातील १५ पैकी १२ तालुक्यांमध्ये ८४ टँकर सुरू आहे. २५२ गाव व वाड्यांवरील एक ते दीड लाख नागरिकांची तहान भागवली जात आहे. येवला तालुक्यात २० टँकर सुरू आहे.


यामध्ये सिन्नर तालुक्यातील 80 गावांना 14 टँकर सुरु असून अनुक्रमे येवला 53 गावे 20 टँकर, मालेगाव 23 टँकर 11 गावे, बागलाण 20 टँकर 10 गावे, इगतपुरी 14 टँकर 04 गावे, नांदगाव 14 टँकर 02 गावे, पेठ 13 टँकर 07 गावे, चांदवड 12 टँकर 05 गावे, सुरगाणा 09 टँकर 06 गावे, त्र्यंबक 08 टँकर 02 गावे, त्र्यंबक 08 टँकर 02 गावे, देवळा 05 टँकर 02 गावे, नाशिक 01 टँकर 01 गावे अशी टँकर संख्या सध्या जिल्ह्यात आहे. 


शेतकरीही चिंतेत
नाशिक जिल्ह्यात पावसाने आतापर्यंत मालेगाव,नांदगाव व चांदवड या तालुक्यांमधील काही भागात  हजेरी लावली असल्याने या ठिकाणी खरीप पूर्व मशागतीला अल्प प्रमाणात सुरुवात झाली आहे. मात्र,त्या तुलनेत  जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात नाशिक तालुक्याश इगतपुरी, त्र्यंबकेश्वर,सुरगाणा या अधिक  पावसाच्या भागासह सुरगाणा,निफाडझ येवला या तालुक्यात मात्र अत्यल्प पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.


आजपासून पावसाचा वेग वाढणार
दरम्यान, सक्रिय मान्सूनची स्थिती पाहता, 18 जून 2022 पासून कोकण आणि लगतच्या घाट भागात पावसाचा वेग हळूहळू वाढण्याची अपेक्षा आहे. या कालावधीत प्रदेशात वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति अतिवृष्टीसह व्यापक पर्जन्यवृष्टी अपेक्षित असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.