Nashik Rain : नाशिक (Nashik) जिल्ह्यात अनेक भागात ढगाळ वातावरण (Climate Change) आणि पावसाची हजेरी (Unseasonal Rain) सुरू आहे. आज साडे चार वाजेच्या सुमारास नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागात बेमोसमी पावसाने हजेरी लावली. नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) गिरणारे आदी भागात जोरदार हजेरी लावली. बेमोसमी पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
नैऋत्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ तयार झाल्याने मध्यम हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानुसार आज नाशिक शहरातील नाशिकरोड, सिडको, मखमलाबाद, गंगापूर रोड आदी परिसरात बेमोसमी पावसाने हजारी लावली. त्याचबरोबर जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, गिरणारेसह हरसूल भागात देखील बेमोसमी पावसाचे आगमन झाले.अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. तर दुसरीकडे गिरणारे आणि त्र्यंबक परिसरात जोरदार पाऊस सुरु असल्याने रब्बी पिकांची नासाडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी पुरता धास्तावला आहे.
नाशिकमध्ये आज सकाळपासून हवामानात बदल जाणवत होता. ढगाळ हवामानासह हवेत गारवा जाणवत असल्याने पावसाची शक्यता होती. अखेर साडे चार वाजेच्या सुमारास नाशिक शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आल्याने पाऊस सुरु झाल्याने नाशिककरांची तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर नाशिकसह जिल्ह्यात अनेक भागात गेल्या तीन चार दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे अगोदरच द्राक्षबागांसाह शेतमालावर विपरीत परिणाम होत असतानाच, आज दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली. कालही मनमाड, कळवण या तालुक्यात पावसाने हजेरी लावली. येवल्यातही ढगाळ वातावरण असल्याने सूर्यदर्शन नाही. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. कांदा पिकांवरही करपा रोग पडु लागला आहे. गेल्याच महिन्यात बेमोसमी पाऊस आणि खराब वातावरणामुळे द्राक्ष, भाजीपाला वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना महागड्या औषधांची फवारणी करावी लागली होती.
दरम्यान आज पुन्हा बेमोसमी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. आज सकाळपासूनच आकाश ढगाळलेले होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास थेंब थेंब पाऊस सुरू झाल्यानंतर सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास बेमोसमी पावसाचे जोरदार आगमन झाले. नाशिक शहरालगतच्या गिरणारे परिसरात द्राक्ष आणि टोमॅटो पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते, मात्र अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. शिवाय काही दिवसांपूर्वी लागवड केलेला गहू, हरभरा या रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.