Nashik News : 'तुम्ही एखाद्या दुकानातून फरसाण, शेव किंवा इतर कुठलेही खाद्यपदार्थ खरेदी करत असाल तर ते नक्की परवानाधारक कारखान्यातच बनवले गेले आहेत का? याची आधी खात्री करून घ्या... कारण नाशिक (Nashik) शहरातील तपोवन परिसरात असलेल्या देवीकृपा फूड्स अँड प्रॉडक्ट्स कंपनीवर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने टाकलेल्या छाप्यात हा कारखाना चक्क विना परवाना सुरू असल्याचे समोर आले आहे.
पनीरचा बनावट साठा जप्त करण्यात आल्याच्या घटनेला काही तास उलटत नाही, तोच पुन्हा एकदा अन्न आणि औषध प्रशासनाकडून कारवाई (FDA Raid) करण्यात आली आहे. बनावट, भेसळयुक्त आणि विनापरवाना अन्न पदार्थाची विक्री करणाऱ्यांवर जवळपास दररोज कारवाई होत असतानादेखील हे प्रकार थांबण्याची चिन्हे दिसत नाही. नाशिक शहरातील पंचवटीत (Panchavati) अन्न आणि औषध प्रशासनाने विनापरवाना उत्पादन आणि विक्री करणाऱ्या फरसाण दुकानावर छापा मारून सुमारे एक लाख रुपये किमतीचा 656 किलो फरसाणचा (Snaks) साठा जप्त करण्याची कारवाई केली आहे. अन्न आणि औषध प्रशासन सहआयुक्त संजय नारगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. सहायक आयुक्त मनीष सानप, अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर, अविनाश दाभाडे यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे.
विशेष म्हणजे, एका पत्र्याच्या शेडखाली सुरू असलेल्या या कारखान्यात कमालीची अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली होती. प्रशासनाने या ठिकाणाहून लसूनी फरसाण, मद्रास फरसाण, बारीक शेव, भावनगरी शेव असा एकूण 1 लाख 11 हजार रुपये किमतीचा 656 किलो साठा जप्त करत त्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत, अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई केली जाणार आहे. परवाना नसल्याने उत्पादन आणि विक्री बंदची नोटीसही कारखान्याला बजावण्यात आली आहे. मात्र किती दिवसांपासून आणि कोणाच्या आशीर्वादाने हा कारखाना खुलेआम अशाप्रकारे सुरू होता? हा खरं तर प्रश्नच आहे. जिल्ह्यात असे किती कारखाने असतील याचाही शोध प्रशासन घेणार का? हे ही बघणं महत्वाचं ठरणार आहे.
उत्पादन व विक्री बंदची नोटीस
सणासुदीच्या धडक मोहिमेंतर्गत जनतेस निर्भेळ आणि सुरक्षित अन्न पदार्थ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने देवीकृपा फूड प्रोडक्ट्स यंदे मळा, तपोवन रोड, पंचवटी या कारखान्यात तपासणी असल्याचे आढळून आले. परिणामी घटनास्थळावरून लसूण, फरसाण, मद्रास फरसाण, लाल शेव, पिवळी शेव, भावनगरी शेव यांचे नमुने विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित एक लाख 11 हजार 550 रुपये किमतीचा 656 किलो फरसाण साठा जप्त करून हा साठा उत्पादकांच्या ताब्यात सुरक्षित ठेवला आहे. या मोहिमेत एकूण अन्न नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले असून, विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 अन्यये पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :