Nashik News : गेल्या महिन्यातील संप मिटवून तोच पुन्हा एकदा नाशिकच्या सिटीलिंक बस कर्मचाऱ्यानी संपाचे हत्यार उपसले आहे. नाशिक (Nashik) शहरातील प्रमुख वाहतूक वाहतूक व्यवस्था असलेली सिटीलिंक बससेवा (citylink Bus) पुन्हा एकदा विस्कळीत झाली असून सिटी कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून संप पुकारला आहे. काही दिवसांपूर्वीच या कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचा संप पुकारला होता. त्यानंतर बैठक होऊन संप मागे घेण्यात आला होता. आज पुन्हा सकाळपासून संप पुकारल्याने प्रवाशांचे मोठे हाल सुरु झाले आहेत. रोजच्या नोकरदारवर्गाला मोठा फटका या संपामुळे बसला आहे. 


नाशिक मनपाने (Nashik NMC) जुलै 2021 मध्ये शहरात सिटीलिंक बस सेवा सुरू केली. त्यानंतर या बस सेवेला नाशिककरांचा चांगला प्रतिसादही लाभला. मात्र अलीकडच्या वर्षभरात सिटीलिंक कर्मचाऱ्यांची सातत्याने आंदोलने सुरू आहेत. आतापर्यंत या कर्मचाऱ्यांनी तीन ते चार वेळा संप केला असून पंधरा दिवसांपूर्वीच म्हणजे 18 जुलै रोजी संप पुकारण्यात (Citylink Protest) आला होता. हा संप दोन दिवस चालल्यानंतर महापालिकेने तोडगा काढत 21 जुलैपर्यंत ठेकेदार सर्व कर्मचाऱ्यांचे पगार करतील, असे आश्वासन दिले. त्यामुळे सर्व कर्मचारी कामावर परतले होते. परंतु ठेकेदाराने दिलेले आश्वासन पाळले नसल्याने पुन्हा एकदा आज सकाळपासून कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.


गेल्या काही दिवसांपूर्वी सिटीलिंक (Citilinc) बसच्या वाहकांनी वेतन अभावी संप पुकारला होता. त्यावेळी प्रभारी मनपा आयुक्त बानायत यांनी कंपनी प्रतिनिधी व ठेकेदार यांची बैठक घेऊन दोन दिवसांत मागील दोन महिन्यांचे थकीत वेतन अदा करण्याचे आदेश दिले होते. ठेकेदाराने आदेश मान्य करून 21 जुलैपर्यंत पगार देणार, असे आश्वासन दिले होते. मात्र ठेकेदाराने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यामुळे वाहकांनी आज पुन्हा एकदा संप पुकारला आहे. सकाळपासून बस बंद असल्यामुळे प्रवासी, नोकरदार तसेच विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहे. सर्व वाहक तपोवन डेपोत एकत्र आले असून अधिकारी वर्ग संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.


वर्षभरात पाचव्यांदा संप 


नाशिक शहरातील सिटीलिंक बससेवा पुन्हा एकदा ठप्प झाली आहे, ठेकेदाराने आश्वासन पूर्ण न केल्याने वाहक पहाटेपासून पुन्हा संपावर गेले आहेत. त्यामुळे आज सकाळपासून एकही बस रस्त्यावर धावली नाही. सिटीलिंक बस बंद असल्याने प्रवाशी, नोकरदार, विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. रिक्षाला त्यामुळे प्रतिसाद लाभत असल्याने नेहमीप्रमाणे त्यांनी जादा पैसे आकारले जात असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. सर्व वाहक डेपोत तपोवन येथे जमा झाले असून हा वर्षभरात पाचव्यांदा संप करण्यात आलं असून अधिकारी वर्ग तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे.


इतर संबंधित बातम्या : 


Nashik News : नाशिक सिटीलिंक बससेवा ठप्प, दोन महिन्यांपासूनच पगारच नाही, चालक-वाहक संपावर