Nashik Cyber Crime : नाशिक (Nashik) शहरात गुन्हेगारीसह सायबर गुन्हेगारीत वाढ झाली असून, गुन्हेगारी रोखण्यासाठी नाशिक शहर पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. सायबर गुन्हे रोखण्यासाठी (Cyber Crime) आता शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांना सायबर साक्षर करुन सायबर दूत बनवले जाणार आहे. हे विद्यार्थी सायबर गुन्ह्यांविरोधी जनजागृती करणार आहेत. 


नाशिक शहरासह जिल्ह्यात (Nashik District) मोठ्या सायबर गुन्हेगारी वाढली असून यावर अंकुश लावण्यासाठी नाशिक शहर सायबर पोलीस (Nashik Cyber Crime) वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. मात्र तरीदेखील अनेकदा नागरिक आमिषाला बळी पडून सायबर गुन्ह्यात अडकले जातात. अशावेळी सोशल मीडियाचा आधार घेऊन सायबर हॅकर्स पैशांची मागणी करत असतात. यातून ऑनलाईन फसवणूक करणे, मोबाईल हॅक करुन डेटा चोरी करणे, अश्लिल चॅटिंग आणि व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल करणे यासह टीमव्ह्युवर, एनीडेस्कसारखे अॅप डाऊनलोड करण्यास सांगून बँक खात्यासह मोबाईलचा अॅक्सेस मिळवत परस्पर रक्कम काढून घेतल्याचे गुन्हे दाखल आहेत. 


त्यामुळे नाशिककर आणि इतर सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या नागरिकांमध्ये सायबर साक्षरता येणे महत्वाचे आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी हे महत्वाचे आहे. असे गुन्हे टाळण्यासाठी सायबर पोलीस उपाययोजना आणि जनजागृती करत असले, तरी सर्वसामान्यांत तेवढी जागरुकता वाढलेली नाही. सायबर सुरक्षितता सर्वसामान्य नागरिकांमध्ये वाढवण्यासाठी पोलीस आयुक्त सायबरदूत ही संकल्पना सुरु केली. तिचा शुभारंभ महाराष्ट्रदिनी 1 मे 2023 पोलीस आयुक्त कार्यालयातील भीष्मराज हॉलमध्ये सायबर जनजागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली. 


पोर्टलवर तक्रार करा


यावेळी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त वसंत मोरे आणि सायबरचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे हे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेमध्ये शहरातील विविध शाळा व कॉलेजमधील जवळपास 300 शिक्षक आणि विद्यार्थी सायबरदूतचे प्रशिक्षण घेण्यासाठी सहभागी होणार आहेत. नागरिकांनी आपली ऑनलाईन फसवणूक झाल्यास तात्काळ नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल (NCORP) वरील www.cybercrime.gov. in या वेबसाईटवर आणि सायबर हेल्पलाईन नंबर 1930 यावर तक्रार नोंदवावी किंवा जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवावी असे आवाहन डॉ. कोल्हे यांनी केले आहे.


अशी केली जाणार जनजागृती


सायबर जनजागृती कार्यशाळेत सहभाग नोंदवणाऱ्यास सायबरदूतचे कामकाज कसे करावे, याबाबत सायबर तज्ज्ञ, वरिष्ठ अधिकारी व अंमलदार मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षित सायबर दूत शहरतील नागरिक, शाळा आणि कॉलेजेसमधील इतर विद्यार्थ्यांना सायबर साक्षर करतील. लागणारे साहित्य पोलीस पुरवणार असून 'सायबर दूत'चे प्रशिक्षण पूर्ण केलेल्यांना प्रमाणपत्र आणि सायबर दूतचा बॅच देण्यात येणार आहे. बॅच मिळालेले सायबरदूत स्वतः सायबर शिक्षित झाल्याने समाजातील इतर घटकांना सायबर साक्षर करतील. सायबर गुन्हे रोखण्यासाठी प्रयत्न करतील. विविध ठिकाणी सायबर जनजागृती कार्यक्रम करुन व्याख्यान देतील. या गुन्ह्यांना बळी पडलेल्यांना आवश्यक मदत करतील.