Nashik Maharashtra Bank Fraud : देवळा तालुक्यातील (Deola Taluka) भऊर येथील महाराष्ट्र बँकेच्या (Mahaarshtra Bank) शाखेमध्ये केलेल्या अपहार प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. बँकेच्या शाखाधिकारी आणि कॅशिअर देखील या घोटाळ्यात सहभागी असल्याचे समोर आले आहे. या दोघांनाही देवळा पोलिसांनी (Deola Police) अटक केली असून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात महाराष्ट्र बँकेची भऊर शाखा आहे. दोन दिवसांपूर्वी या बँकेत दीड कोटींचा घोटाळा (Maharashtra Bank Fraud) झाल्याचे समोर आले होते. बँकेत २०१६ पासून कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने ३२ खातेधारकांना गंडा घालत बँकेचीही फसवणूक केली. घोटाळा उघडकीस आल्यानंतर हा कर्मचारी फरार झाला होता. त्यास नाशिक ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत अटक केली. तसेच त्यास सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान या प्रकरणाचा तपास सुरु असताना देवळा पोलिसांना आणखी माहिती मिळाली.
देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज बँकेचा शाखाधिकारी अमित शर्मा आणि कॅशिअर आप्पा सोनावणे यांना देखील या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याचबरोबर या दोघांचेही निलंबन करण्यात आले आहे. प्रथम दर्शनी सुमारे दीड कोटी रुपयांचा हा अपहार दिसत असला, तरी तक्रारदारांची रीघ बँकेसमोर कायम असल्याने अजून हा आकडा खूप मोठा असल्याचे बोलले जात आहे. इतक्या मोठ्या अपहारात नेमका कुणाकुणाचा सहभाग आहे, हे पोलीस तपासात उघडकीस येणार असून त्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
दरम्यान बँकेचे शाखाधिकारी अमित शर्मा हे ऑक्टोबर 2020 पासून शाखेत कार्यरत असून या संपूर्ण कालावधीत हा प्रकार घडल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाखाधिकारी आणि कॅशिअर यांच्यावर निलंबनाची कारवाई करून देवळा पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. त्यांना कळवण न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणात बँकेचे शाखाअधिकारी आणि कॅशिअर देखील सहभागी असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
देवळा तालुक्यातील बहुर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत दीड कोटींचा आर्थिक अपहार झाल्याचे समोर आले होते. सदर बँकेत २०१६ पासून कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याने हा घोटाळा केल्याचे उघडकीस आले होते. या अपहार प्रकरणात सहभागी असलेला रोजंदारी सफाई कर्मचाऱ्यावर देवळा पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला परवा अटक केली होती. काल त्याला कळवण न्यायालयात हजर केले असता त्याला कळवण न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. बँकेतील ३२ खातेधारकांचा विश्वास संपादन करून हे पैसे लाटल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. त्यानंतर आज बँकेच्या आणखी दोन कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.