Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) पुन्हा धोकादायक वाडा कोसळला (Old Building) असून यात दोघेजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे वाडे कोसळणार हे माहित असूनही स्थानिक वाडा मालक व भाडेकरू जीव धोक्यात घालून वास्तव्य करत असल्याचे दिसत आहे.
एकीकडे नाशिक शहरातील मनपा प्रशासन (Nashik NMC) धोकादायक वाडयांना नोटिसा देऊन वाडे रिकामे करीत आहेत. मात्र दुसरीकडे अनेक वाडे मालकांना नोटिसा देऊनही सहकार्य करत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान काल रात्रीच्या सुमारास धोकादायक वाड्याचा भाग कोसळला. यामध्ये रस्त्याने जाणारे दोन जखमी झाले आहेत. घटनेनंतर नागरिकांची धावपळ उडाली.
नाशिक शहरात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धोकादायक वाड्यांचे काही भाग कोसळण्याचे सत्र सुरू आहे. काल रात्रीच्या सुमारास चौक मंडई जवळ असलेल्या बुरुड गल्लीत धोकादायक वाडा कोसळला. या घटनेत दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रात्री साडेदहाच्या सुमारास ही भिंत कोसळली. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या युनूस इब्राहिम शेख व कादिर युनूस शेख यांच्या अंगावर भिंत कोसळल्याने ते जखमी झाले. यावेळी जवळ राहणाऱ्या नागरिकांनी धावपळ करून त्यांना एका रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मदत कार्याला प्रारंभ केला.
वाडे उतरवण्यास सुरवात
दरम्यान नाशिक शहरात मागील आठवड्यापासून पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. दरवर्षी पावसाळ्यात शहरातील धोकादायक वाड्यांच्या प्रश्न ऐरणीवर येत असतो. यंदा मात्र प्रशासनाने कडक भूमिका घेत दोन नोटीस बजावल्यानंतर थेट कारवाईचा इशारा दिला होता. त्यामुळे दुसरी नोटीस बजावल्यानंतर आता महापालिका प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आला असून सहा धोकादायक वाडे आतापर्यंत रिकामे करण्यात आली आहे. विभागीय अधिकाऱ्यांनी त्वरित वाडे रिकामे करण्याची कारवाई करावी, तसेच त्यांचा पाणी व वीज कनेक्शन खंडित करण्यात यावा, असे आदेश देण्यात आले आहे.
यापूर्वीही अनेक घटना
नाशिक शहर परीसरात विशेषता जुने नाशिक तसेच पंचवटी, गंगाघाट परिसरातील जुने वाडे दर पावसाळ्यात कोसळण्याच्या घटना यापूर्वी झाल्या आहेत. अनेक घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित हानी देखील झाली आहे. तसेच कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. भाडेकरी व घर मालक यांच्यातील वादामुळे जुने नाशिक तसेच गंगा घाट परिसरातील अनेक वाडे अत्यंत जीर्ण अवस्थेत आहेत. नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस अद्यापही कायम आहे. या पावसात नाशिकमध्ये आतापर्यंत चार वाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे नाशिक मनपा (Nashik NMC) प्रशासन ऍक्शन मोडवर आले असून धोकादायक वाडे रिकामे करण्यास सुरवात केली आहे.