Nashik Crime : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात एका रात्री दोन दरोड्याच्या घटना उघडकीस आल्या असून दापुरसह दोडी गावात घटना घडल्या आहेत. या घटनांत अज्ञात चोरट्यांनी लाखोंचे दागिन्यांसह रोकड चोरी केली आहे. दापूरच्या घटनेत सव्वा चार तोळे सोने, पाच हजार रुपये तर दोडी गावातील दरोड्यात दीड तोळे सोने पाठवल्याचे समोर आले आहे. तसेच दोघे जखमीदेखील आहेत. 


सिन्नरच्या दापुर (Sinner) येथील काकड मळा येथे सुनिल छबु आव्हाड यांची वस्ती आहे. ते आपली पत्नी सविता व मुलगा संग्राम यांच्यासोबत राहतात. त्यांच्या घराजवळही काही घरांची वस्ती आहे. पहाटे 3. 30 वाजेच्या सुमारास आव्हाड कुटुंबीय झोपलेले असताना तीन जणांच्या टोळक्याने त्याच्या घरावर दरोडा टाकला. दरोडेखोरांनी आपल्या सोबत चाकू, सुरी, कुऱ्हाड घेऊन आले आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरोडेखोरांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. दरम्यान आवाज आल्याने सुनिल आव्हाड यांना जाग आली. मात्र, काही कळण्याच्या आतच दरोडेखोरांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या पत्नी सुनीता यांनाही जाग आली. त्यावेळी दरोडेखोरांनी त्यांना चाकूचा धाक दाखवला. 


दरम्यान दरोडेखोरांनी (Robbery) घरातील दागिने, पैसे काढून देण्यास सांगितले. मात्र, आव्हाड दाम्पत्याने विरोध केल्याने दरोडेखोरांनी सुनील यांच्या उजव्या गालावर चाकूने वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांनी सविता यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून घेतली. तसेच त्यांच्या कानातील सोन्याचे झुबके ओरबाडून घेतल्याने त्यांचा कान फाटला गेला. त्यामुळे त्याही जखमी झाल्या. यानंतर दरोडेखोरांनी घरातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त करत घरात ठेवलेली पाच हजारांची रोकड चोरी करत तेथून पोबारा केला. घटनेनंतर आव्हाड यांनी आरडाओरडा केल्याने शेजारील वस्तीवरील लोक जमा झाले. घडलेला प्रकार त्यांनी ग्रामस्थांनी सांगितल्यानंतर काहींनी वावी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी (Vavi Police) तात्काळ घटनास्थळी येत पाहणी केली. जखमींना नांदूरशिंगोटे येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुनील आव्हाड यांच्या गालावर चाकूने वार केल्याने तब्बल 40 टाके पडले आहेत. तर सुनिता यांच्या कानाला मोठी जखम झाली आहे. याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



दोडी परिसरात दुसरा दरोडा 


सिन्नर तालुक्यातील दोडी आणि दापूर येथे शुक्रवारी मध्यरात्री दोन ठिकाणी घरफोडी झाल्याच्या घटना घडल्या. यात दापुरी येथील घरातील सदस्यांना बेदम मारहाण करण्यात आली असून महिलेसह सुनील आव्हाड जखमी झाले आहेत. घरफोडीचा दुसरा प्रकार दोडी-दापूर रस्त्यावरील दोडी शिवारात साई सदगीर यांच्या वस्तीवर घडला. चोरट्यांनी दरवाज्याची आतून लावलेली कडी उघडत प्रवेश केला. यावेळी घरातील माणसाना दमदाटी करून सासू आणि सुनेच्या अंगावरील दीड तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी हस्तगत केले. यात ताई सदगीर यांच्या कानाची पाळी देखील तुटली. त्यांना देखील नांदूरशिंगोटे येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.