Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) बिबट्याचा संचार वाढत असून हल्ले वाढतच असून आता देवळाली कॅम्पसह (Deolali Camp) वडनेर दुमाला येथून बिबट्याला (Leopard) जेरबंद करण्यात वनविभागाला  यश आले आहे. त्यामुळे स्थानिक परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून बिबट्याचा दिवसेंदिवस वाढणारा संचार नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. 


नाशिक शहरातील देवळाली कॅम्पचा परिसर आणि दारणा लगतचा परिसरात हा नेहमीच बिबट्याचा संचार दिसून येतो.  त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि पंपिंग स्टेशनच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असते. दरम्यान देवळाली कॅम्प परिसरातील पगारे चाळ परिसरात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला आहे. वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात रात्री आठच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला. मिलिटरी परिसर तसेच घनदाट झाडीने वेढलेला परिसर असल्याने बिबट्याचा नेहमीच या भागांत संचार असतो. 


नाशिकचा पश्चिम पट्ट्यासह देवळाली कॅम्प, संसरी, भगूर, राहुरी, दोनवाडे परिसरात उसाचे मोठे क्षेत्र आहे. त्यामुळे बिबट्यांना अधिवासासासाठी योग्य जागा मिळत असल्याने येथेच वास्तव्य करत असल्याचे दिसून येते. कधी भक्ष्याच्या शोधार्थ तर कधी तहान भागविण्यासाठी बिबटे बाहेर पडतात. अशावेळी रात्रीच्या सुमारास तर कधी दिवसाढवळ्या देखील बिबट्याचे दर्शन झाल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांसह शेतकऱ्यांनी परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली होती. 


यानुसार वनविभागाने तातडीने दखल घेत पगारे मळा परिसरात पिंजरा लावला होता. सोमवारी संध्याकाळी रात्री साडेआठच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाल्याचे स्थानिकांनी वन विभागाला सांगितले. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी विवेक भदाणे, विवेक अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपथकाने पगारे मळ्यात जाऊन पिंजऱ्यात अडकलेला बिबट्याला ताब्यात घेतले.


वडनेर दुमालाही बिबट्या जेरबंद


दरम्यान, आज पहाटे वडनेर दुमाला येथील रेंज रोडवरील बाजीराव पूजा पोरजे यांच्या मळ्यात एक बिबट्या जेरबंद झाला. यानंतर वनरक्षक गोविंद पंढरे, वनमजूर निवृत्ती कोरडे, वाहनचालक अशोक खानझोडे, रेस्क्यू टीमने पिंजऱ्यासह बिबट्यास नाशिक येथे सुरक्षित घेऊन गंगापूर रोपवाटिका येथे ठेवले आहे. 


बिबट्याचा संचार नेहमीच 


देवळाली कॅम्प परिसरासह दारणा लगतचा परिसरात बिबट्याचा संचार नेहमीच असतो. याच परिसरातून सोमवारी रात्री बिबट्या कैद झाल्याने वन विभागाला दिलासा मिळाला असला तरी परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये मात्र अजूनही भीती आहे. कारण या परिसरात अजूनही बिबटे असून, या भागांत पुन्हा पिंजरा लावावा, अशी मागणी करण्यात आली आहे.