हल्ली नाशिक शहरात बिबट्याचा वावर नित्याचा झाला आहे. तसेच ग्रामीण भागातही बिबट्या दिसून येत असल्याने भीतीचे वातावरण असते. त्यामुळे हल्ले किंवा नागरिकांचे जखमी होणं, हे घडत आहे. अशावेळी माध्यमांनी योग्य भूमिका घेणं महत्वाचं आहे. आपल्या बातम्यांमधून बिबट्या हा व्हिलन ठरु नये, जेणेकरुन जनसामान्यांमध्ये बिबट्याप्रति नकारात्मक भावना निर्माण होणार नाही. 


नाशिक आणि बिबट्या हे जणू समीकरण झालं आहे. त्यामुळे बिबट्या मानवी परिसरात आढळून येणं काही नवीन नाही. नाशिक शहर आणि लगतचा परिसर हा शेतीयुक्त असल्याने ऊस, गहू, द्राक्ष तसेच मोठ्या प्रमाणावर जंगल परिसर असल्याने बिबट्याचा संचार दिसून येतो. अनेकदा शेतात बांधलेल्या बकऱ्या, कोंबड्या, गुरे जनावरे यांच्यावर बिबट्याकडून हल्ला करण्यात येतो. अनेकवेळा नागरिकांवर हल्ल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये बातम्या करताना शीर्षक किंवा मथळा भडक असू नये फोटो छापताना आक्रमक नसावा, यासारखी काळजी घेतली पाहिजे.


'बिबट्यासोबत माध्यमांचे सहजीवन' या विषयावर परिसंवाद 


नाशिकमध्ये नाशिक पश्चिम वनविभाग आणि वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी यांनी बिबट्यासोबत माध्यमांचे सहजीवन यावर परिसंवादाचे आयोजन केले होते. यावेळी पत्रकार अक्षय मांडवकर यांनी संवाद साधला. याद्वारे बिबट्या आणि मानव यातील द्वंद्व उलगडण्यात आले. माणसे टाळण्यासाठी बिबटे खूपच प्रयत्नशील असतात. त्यांची समस्या ही आहे की ते अत्यंत संयोजनक्षम प्राणी आहेत आणि ते माणसांच्या अगदी जवळ राहू शकतात. हल्ली नाशिक शहरात कुठेही बिबट्या आढळून आला की, पत्रकारांची फौज तयारच असते. बिबट्या एखाद्या झाडावर अगदी शांतपणे जरी बसलेला दिसला तरी लगेच माध्यमांची फोना फोनी सुरु होतो, सर्वच पत्रकार त्याठिकाणी उड्या घेतात, त्याचबरोबर स्थानिक नागरिकांची बिबट्या असलेल्या ठिकाणी झुंड तयार होते. ही झुंड नंतर नियंत्रणात आणता येत नाही आणि जास्तीत जास्त वेळेस बिबट्या यातून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. असे करताना त्याच्याकडून काही लोकांना इजा होते आणि मग त्यांना जणू त्या बिबट्याला मारायचा अधिकारच मिळतो. आणि हा सगळा प्रकार आक्रमकरित्या कॅमेऱ्यात किंवा कागदावर उतरवला जातो. 


विशेष म्हणजे अशाप्रकारचे आक्रमक आणि भीषणता दाखवणारे वार्तांकन हे फक्त बिबट्यांचेच नव्हे तर नागरिकांसाठी मोठे नुकसान करु शकते. जास्तीत जास्त भीती निर्माण केली गेली की लोकांकडून त्यांना आपल्या परिसरातून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी जोर धरु लागते. वन विभाग परिसरात पिंजरा लावून बिबट्याला पकडून जवळच्या जंगलात सोडून देते. परंतु बिबट्याच्या मूळप्रकृतीमुळे ही समस्या आणखीच बिघडते. बिबट्या हा एक अत्यंत स्थाननिष्ठ प्राणी आहे. प्रौढ बिबटे आपले घर सोडत नाहीत. आता जर अशा एखाद्या प्राण्याला पकडून 400 किलोमीटर दूरही नेऊन सोडले तरी तो परत आपल्या घरी येण्याचा प्रयत्न करतो, अस दिसून आलं आहे. 


अतिरंजित आणि भडक तथ्यहीन वार्तांकन टाळावं


अशावेळी इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमांनी बिबट्याबद्दलच्या घटना कव्हर करताना अतिरंजित आणि भडक तथ्यहीन वार्तांकन टाळावे. बिबट्याचे हल्ले हे कशामुळे होत आहेत, याचा बारकाईने अभ्यास करत वनाधिकाऱ्यांशी चर्चा करावी. प्रत्यक्षरित्या फिल्डवर हजर राहून वार्तांकन करण्यावर भर द्यावा. कारण फिल्डवरील परिस्थिती वेगळी असते. बिबट्याने नागरिकांच्या वसाहतीत प्रवेश केल्यानंतर वार्तांकनासाठी सैरभैर होणे टाळावे. इलेक्ट्रॉनिक चॅनलमधून वारंवार बिबट्याचा आक्रमक चेहरा असलेले फोटो, व्हिडीओ दाखवले जातात, ते टाळायला हवे. शहरी भागातील बिबट्या आणि त्याचा सुरु असलेला संघर्ष दुर्लक्षित करुन माध्यमांनी एकतर्फी वार्तांकन टाळायला हवे, जेणेकरुन बिबट्या जनसामान्यांमध्ये व्हिलन ठरणार नाही. माध्यमांमधून प्रसारित होणाऱ्या बातम्यांमुळे सामान्य जनतेची मानसिकता तयार होत असते, यामुळे बिबट्याबाबतचे वार्तांकन समतोल साधणारे हवे. ज्या भागात बिबट्या दिसला किंवा आला तेथे दुसऱ्या दिवशी वन्यजीवप्रेमी आणि वनकर्मचाऱ्यांनी जाऊन नागरिकांच्या भेटी घेऊन संवाद साधायला हवा. लोकाभिमुख वार्तांकन करत बिबट्यालाही न्याय द्यावा, कारण वन्यजीव जैवविविधता आणि अन्नसाखळीतील महत्त्वाचा वन्यप्राणी असून भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यात शेड्यूल-1 मध्ये त्याला संरक्षण दिलेले आहे. वाघाइतकेच संरक्षण कायद्याने बिबट्याला दिलेले आहे. यामुळे बिबट्याबाबत संवदेनशील वार्तांकन गरजेचे आहे.