नाशिक : नाशिक (Nashik) शहरात सध्या पोलीस आहेत का? असाच प्रश्न उपस्थित होतोय. कारण शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून गुरुवारी रात्री अंबड लिंकरोड परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दोन युवकांची निर्घृणपणे हत्या (Youth Murder) करण्यात आली आहे. या घटनेमुळे शहर हादरून गेला आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे नाशिक शहरात (Nashik Crime) सर्रास गुन्हेगारी बोकाळली असून पोलिसांचा वचकच आहे की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 


तारीख - 10 ऑगस्ट 2023.. वेळ - सायंकाळी सात वाजता.. ठिकाण - अंबड लिंक रोडवरील (Ambad Link Road) संजीव नगर परिसर..संजीवनगर परिसरात झालेल्या दुहेरी हत्याकांडाच्या (Doble Murder Case) घटनेमुळे नाशिक शहर सध्या हादरून गेला आहे. गुरुवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास संजीवनगरच्या भरवस्तीत वाहनांची वर्दळ होती, लहान मुले खेळत होती तर महिला वर्गाच्याही कॉलनीत उभ्या राहून गप्पा रंगलेल्या असतानाच अचानक दहा ते बारा जणांचे टोळके हातात लाकडी दांडके, चाकू आणि धारदार शस्त्र घेऊन पळत सुटले आणि त्यांनी दोघांवर हल्ला (Murder) चढवत इथून पळ काढला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या 18 वर्षीय मेराज खान आणि 19 वर्षीय इब्राहिम शेखचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 


तत्पूर्वी घटना घडल्यानंतर दोघांच्या नातेवाईकांनी दोघांनाही तात्काळ नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवलं, मात्र इथे उपचार केले जात नसल्याचा आरोप करत तसेच पोलिसांचा निषेध नोंदवण्यासाठी त्यांनी थेट जखमी मेराज खानला अॅम्ब्युलन्समध्ये टाकत नाशिक पोलीस आयुक्तालय गाठलं, पोलीस अधिकाऱ्यांनी समजूत घालताच पुन्हा अॅम्ब्युलन्स जिल्हा रुग्णालयाकडे वळवण्यात तर मात्र मेराज खानचा रात्री नऊ वाजेच्या सुमारास तर इब्राहिमचा मध्यरात्री उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.


दरम्यान या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनंतर संजीवनगर परिसरासह जिल्हा रुग्णालयाच्या आवारात तणावाचे वातावरण पसरले होते, नातेवाईकांचा आक्रोश बघायला मिळत होता. पोलीस आयुक्त अंकुश शिंदेंसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते, जिल्हा रुग्णालयाबाहेर शीघ्र कृती दलासह कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मेराज खान हा जवळीलच एका दुकानात केक घेण्यासाठी गेला असता तिथे एका तरुणासोबत त्याचा वाद झाला होता आणि हाच वाद ईतका वाढला की त्यानंतर तरुणाने त्याच्या साथीदारांना घेऊन येत हा हल्ला चढवल्याची प्राथमिक माहिती आहे.  


गुन्हेगारीचा वाढता आलेख चिंताजनक


सायंकाळी सात ते साडे सात दरम्यान संजीवनगर येथे घटना घडली. भाषा न समजल्याने शिवीगाळ आपल्याला केली, या समजातून हा प्रकार घडला. जखमीवर उपचार सुरू असताना मृत्यू झाला असून अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police Station) गुन्हा दाखल झाला आहे. चार आरोपी अटक, दोन विधी संघर्षित बालक आहेत. नक्की काय घडलं, याचा तपास सुरू असून प्रथमदर्शनी असं दिसतंय की, संशयितांनी लाकडी दांडका आणि चाकू घरातून आणल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दुसरीकडे नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने अक्षरशः कळस गाठला असून गुन्हेगारीचा गेल्या महिनाभरातीलच वाढता आलेख चिंताजनक आहे. नाशिक शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. गेल्याच आठवड्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दौरा तर केला मात्र त्यानंतरही गुन्हेगारी आटोक्यात येण्याचं नाव घेत नसून नाशिक पोलीस ऍक्शन मोडवर येणार तरी कधी ? असाच प्रश्न आता नाशिककर विचारतायत..  


 

महिनाभरातील गुन्हेगारी 


7 जुलै - शिंगाडा तलाव परिसरात दोन गटात तलवार कोयत्याने हाणामारी, 9 जुलै - सामन गाव परिसरात थेट एटीएम मशीनच चोरी, 10 जुलै - अंबडच्या महाकाली चौकात दोन गटात लाठ्या काठ्यानी हाणामारी, 12 जुलै - सिडको परिसरात 16 वाहनांची कोयत्याने तोडफोड, 16 जुलै - उंटवाडी परिसरात तरुणावर तलवारीने प्राणघातक हल्ला, 20 जुलै - अंबड परिसरातील इंडियन बँकेवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न, 22 जुलै - तुषार चावरे तरुणाचा बोधले नगरमध्ये भर रस्त्यात धारदार शस्त्राने वार करून खून, 24 जुलै - विहितगाव परिसरात मध्यरात्री हातात कोयते मिरवत तरुणांचा धुडगूस, 18 वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ झाल्याची स्थानिकांची माहिती, 25 जुलै - मध्यरात्री नाशिकरोडच्या धोंगडे नगर परिसरात 6 वाहनांची तोडफोड, 28 जुलै - भरोसा सेलमध्ये पोलिसांसमोरच एका ईसमावर प्राणघातक हल्ला, 06 ऑगस्ट - म्हसरूळ परिसरात पूर्ववैमनस्यातून गौरव थोरात या तरुणावर जीवघेणा हल्ला, 10 ऑगस्ट - अंबड लिंक रोडवरील संजीव नगरमध्ये दोघांची निर्घृण हत्या. 


इतर महत्त्वाची बातमी: