Nashik Crime : अखेर नाशिकचा तहसीलदार नरेशकुमार बहिरम (Nraeshkumar Bahiram) यास विभागीय आयुक्तांनी चांगलाच दणका दिला आहे. पंधरा लाखांची लाच घेणाऱ्या तहसीलदार बहिरम यास निलंबित करण्यात आले आहे. लाच घेतल्यानंतर तहसीलदार चांगलाच चर्चेत आला होता, अखेर नाशिकच्या विभागीय आयुक्तांनी आदेश काढले असून बहिरम याचे निलंबन (Suspend) करण्यात आले आहे. 


काही दिवसांपूर्वी अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणात 15 लाख रुपयांची लाच घेताना नाशिकचा (Nashik Tahsildar) तहसीलदार नरेशकुमार बहिरम यास एसीबीकडून अटक करण्यात आली. यानंतर जिल्हाभरात खळबळ उडाली. अनेक नागरिकांनी रोष व्यक्त करत या प्रकरणाची गंभीर दाखल घेण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी देखील गंभीर दखल घेत चौकशीसाठी पाच अधिकाऱ्याचे पथकही नेमण्यात आले होते. शिवाय निलंबनाचा प्रस्ताव देखील शासनाकडे पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर रात्री उशिरा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बहिरम यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.


राजुर बहुला येथील जमीन मालकाला मुरुम उत्खननाबाबत पाचपट दंड व स्वामित्व धन मिळून एकूण सव्वा कोटींचा दंड ठोठावण्यात आला होता. या कारवाईविरुद्ध तक्रारदाराने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील केले होते. या अपीलावर फेरचौकशीसाठी तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांच्याकडे पाठवण्यात आले होते. सदर मिळकतीमधील उत्खनन केलेला मुरुम त्याच जागेत वापर झाल्याचे जमिनीच्या मालकाने नमूद केले होते. याची पडताळणी करण्यासाठी तहसीलदार बहिरम याने जमीन मालकाला स्थळ निरीक्षण करण्यासाठी बोलावले होते, मात्र प्रकृती ठीक नसल्याने जमीन मालकाने आपल्या वतीने कायदेशीर अधिकार पत्र देत एका विश्वासातील माणसाला त्यांनी पाठवले होते. संबंधित व्यक्ती तहसीलदार बहिरम यास भेटल्यानंतर कारवाईच्या तडजोडीअंती 15 लाख रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली होती.


बहिरमवर निलंबनाची कारवाई 


दरम्यान बहिरम यांना अटक झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचबरोबर सुरुवातीला दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. याचदरम्यान नाशिकमधून प्रचंड संताप सदर भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध व्यक्त करण्यात आला होता. सामान्य नागरिकांमधून तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे. अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करावे, बडतर्फ करावे अशा मागण्याही करण्यात येत होत्या. बहिरम सलग 48 तास पोलीस कोठडीत असल्याने नियमानुसार त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या पूर्व परवानगीशिवाय नरेश कुमार बहिरम यांनी मुख्यालय सोडू नये असे या आदेशात म्हटले आहे.


इतर महत्वाची बातमी : 


15 लाखांची लाच स्वीकारताना तहसीलदाराला रंगेहात पकडले, नाशिकमध्ये ACB मोठी कारवाई