Nashik Crime : नाशिकमधून (Nashik) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथील दोघांनी बॉम्बसदृश्य स्टीलचा डब्बा नेऊन गावातीलच किराणा दुकानदाराला धमकावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवाय दुकानदाराकडून पाच लाख रुपयांची खंडणी देखील संशयितांनी मागितल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 


कोण कधी कुठला राग काढेल हे सांगता येणे शक्य नाही. त्यामुळे किरकोळ कारणातून कुणीही कुणाचा जीव घेण्याचा घटना सातत्याने समोर येत असतात. मात्र सिन्नरच्या (Sinner) गुळवंच गावात अजबच प्रकार समोर आला आहे. खतांची गोणी न दिल्याचा राग मनात धरून दोन मित्रांनी संबंधित दुकानदाराला अद्दल घडविण्याचे ठरविले. त्यानुसार या दोघांनी थेट बॉम्बसदृश्य स्टीलचा डब्बा घेऊन जात बॉम्ब फोडण्याची धमकी देत मारहाण केल्याचा आणि खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन संशयितांविरोधात सिन्नर एमआयडीसी पोलीस (Sinner MIDC Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


विष्णू भाबड, बबन भाबड अशी दोन्ही संशयितांची नावे आहेत. हे दोघेही ज्या गावात घटना घडली. त्याच गावातील राहणार असून गावातच एक किराणा दुकान आहे. या दुकानदाराशी काही दिवसांपूर्वी यातील एकाचा वाद झाला होता. खतांच्या गोण्या खरेदीवरून हा वाद होऊन किराणा दुकानदाराने गोण्या देण्यास नकार दिला होता. याचा राग मनात धरून दोन्ही मित्रांनी संगनमत करून किराणा दुकानदारास अद्दल घडविण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी बॉम्ब सदृश्य स्टीलचा डब्बा घेऊन जात बॉम्ब फोडून उडविण्याची धमकी किराणा दुकानदाराला दिली. त्याचबरोबर पाच लाखांची खंडणीची मागणी केली. 


संशयितांचा शोध सुरु 


दरम्यान भयभीत झालेल्या आंबेकर कुटुंबियांनी तातडीने पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांच्या भीतीने दोघांनीही पलायन केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बॉम्बची खात्री केली. त्यानंतर तातडीने मालेगाव (Malegaon) येथून बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांनी दोन्ही बॉम्ब आज सकाळी निकामी केल्यानंतर पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरु आहे. संशयितांनी स्वतः बॉम्ब बनवला की दुसऱ्या कुणाकडून बनवून घेतला, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. मात्र या घटनेने पोलीस प्रशासन देखील चक्रावले आहे. अशा पद्धतीने बॉम्ब घेऊन खंडणीची मागणी करण्यात आल्याने परिसरात चर्चेचा विषय आहे. मुळात दोघेही गावातीलच असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.