Nashik Suicide : नाशिक (Nashik) जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर येत असून बागलाण तालुक्यात शेतमजूर म्हणून आलेल्या दाम्पत्याने जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जायखेडा पोलिसांना (Jaykheda Police) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या दोघांचा दोनच महिन्यापूर्वी विवाह झाला होता. अशातच त्यांनी जीवन संपविल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
नाशिकसह जिल्ह्यात आत्महत्यांचे (suicide) प्रमाण वाढत असून रोजच तरुण तरुणीच्या आत्महत्यांच्या (Youth Suicide) घटना समोर येत असल्याने चिंतेची बाब ठरत आहे. दुसरीकडे नैराश्यातून, वैवाहिक जीवनाला कंटाळून कुटुंबाच्या वादातून टोकाचे निर्णय घेतले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. अशातच बागलाण तालुक्यातील (Baglan) नामपूर भागातील गोराणे येथील शेतमजुरी करणाऱ्या पती- पत्नीने शेतातील झाडाला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी नोंद केली आहे. या दाम्पत्याचा दोन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता.
बागलाण तालुक्यातील गोराणे येथील दीपक सुरेश अहिरे व रेखाबाई दीपक अहिरे या दाम्पत्याचा दोनच महिन्यापूर्वी विवाह झाला होता. मजुरीसाठी म्हणून ते नामपूरला ठेकेदारी पद्धतीने काम करत होते. सोमवारी या दाम्पत्याने नामपूर शिवारात बाबुराव आनंदराव सावंत यांच्या शेताच्या बांधावर असलेल्या बाभळीच्या झाडाला साडीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. सदर घटनेची खबर मोराणे येथील पोलिस पाटील योगेंद्र शंकर पाटील यांनी जायखेडा पोलिस स्टेशनला कळविली. त्यानंतर पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ, पोलिस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ व सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केले.
दरम्यान दाम्पत्याचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. त्यांचा दोन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. या दोघांमध्ये विवाहावरून वाद सुरु असल्याचे समजते. दोघांचाही विवाहाला विरोध असल्याने पटत नव्हते, एकमेकांना स्वीकारत नव्हते, असा प्राथमिक अंदाज आहे. मृत रेखाबाई हिचे माहेर धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दमणार येथील आहे. या प्रकरणी जायखेडा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
आत्महत्या हा पर्याय नाहीच!
अनेकजण आयुष्यात ताणतणावात असतात. घरातील अडचणी, मुलांच्या शाळा, जॉब्स, कुटुंबातील वाद, आजारपण यामुळे अनेकांच्या आयुष्ता नैराश्य आलेले असते. समस्येशी संघर्ष करण्याची क्षमता गमावल्याची भावना निर्माण झाल्यास व्यक्ती आत्महत्येकडे वळतो. सध्याच्या तरुण तरुणींमध्ये नैराश्याची भावना मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. त्यामुळेच तरुणांच्या आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते. अभ्यासाचा ताण, प्रेमभंग किंंवा प्रेमाला कुटूंबाकडून होणारा विरोध, कार्यालयातील कामांचा तणाव, अतिकामाने येणारा तणाव, यामुळेही अनेकजण आत्महत्येसारखे पाऊल उचलतात.