Nashik Police : नाशिक (Nashik) शहरात चोर पोलिसांच्या पाठशिवणीच्या खेळात संशयित चोराचा मृत्यू (Death) झाल्याची घटना समोर आली आहे. म्हसरूळ परिसरात पहाटेच्या सुमाराला एटीएम मशीन फोडून चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या संशयितांचा पाठलाग करताना गुन्हा शोध पथकाच्या पोलिस वाहनाला एक संशयित धडकला. संशयित गंभीर जखमी झाल्याने उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.
नाशिक (Nashik Police) शहरातील म्हसरुळ परिसरात (Mhasrul) सोमवारी मध्यरात्रीच्या सुमाराला ही घटना घडली. या परिसरात तीन ते चार संशयितांनी एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न अयशस्वी झाल्याने संशयितांनी किशोर सूर्यवंशी मार्गावर असलेल्या एका बँकेच्या एटीएमकडे (ATM Robbery) मोर्चा वळविला. याचवेळी संशयित एटीएम फोडत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच म्हसरूळ पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी, सीआर मोबाईल व गुन्हा शोध पथकाचे पोलिस कर्मचारी किशोर सूर्यवंशी मार्गाच्या दिशेने पोलिस सायरन वाजवत रवाना झाले. किशोर सूर्यवंशी मार्गावर एटीएम फोडण्याचा तयारीत असलेल्या संशयितांना पोलिस वाहनाच्या आवाज आल्याने त्यांनी अंधाराच्या दिशेने पळ काढला.
दरम्यान एक संशयित रस्त्याच्या डाव्या बाजूला पळत असताना थेट गुन्हे शोध पथकाच्या पोलिस वाहनाला (Mhasrul Police) धडकला. त्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला म्हसरूळ पोलिसांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. अपघाताची घटना घडल्यानंतर पोलीस जखमी संशयितास रुग्णालयात नेण्याची धावपळ करीत असताना त्याचे इतर साथीदार मात्र पसार झाले. दरम्यान, रात्र गस्तीवर असलेल्या गुन्हा शोध पथकाच्या पोलिस वाहनाने धडक दिल्याने ठार झालेला संशयित गुन्हेगार असून तो उत्तरप्रदेश किंवा बिहार राज्यातील सराईत गुन्हेगार असल्याच्या पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
अपघात कसा घडला? हे गुलदस्त्यात?
एटीएम मशीन फोडण्याच्या इराद्याने आलेल्या संशयितांचा पोलिस वाहनाने धडक दिल्याने अपघातात मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र संशयित घाबरून पोलिस वाहनाच्या खाली आला की पोलिस वाहन त्याचा पाठलाग करताना संशयिताला धडक दिली. याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. विशेष म्हणजे या अपघाताबाबत म्हसरूळ पोलिस ठाण्यात कोणत्याही प्रकारची नोंद नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणीचे काम हाती घेण्यात आले असून त्यानुसार फरार झालेल्या संशयिताचा तसेच त्यांनी एटीएम फोडण्यासाठी येताना वापरलेल्या वाहनाचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.