Nashik APMC Election : नाशिकमधील बहुचर्चित पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या (Pimplagaon Bajar Samiti) निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शेतकरी विकास पॅनलचे नेते आमदार दिलीप बनकर यांचा विजय झाला असून एकूण 11 जागांवर बनकरांच्या शेतकरी विकास पॅनलने वर्चस्व मिळवले आहे. तर ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम यांना चांगलाच धक्का बसला असून कदम यांच्या लोकमान्य परिवर्तन पॅनलला 6 जागांवर विजय मिळवता आला. 


आज नाशिकसह (Nashik) सात बाजार समिती निवडणुकांची (Nashik APMC Election) मतमोजणी अद्यापही सुरूच आहे. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडीला यश मिळाले असले तरीही मात्र पिंपळगाव बाजार समितीत मात्र वेगळे चित्र पाहायला मिळाले आहे. या बाजार समिती निवडणुकीत  राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी सरळ लढत पाहायला मिळाली. बहुचर्चित पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर (Dilip Bankar) यांच्या शेतकरी विकास पॅनल, तर ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम (Anil Kadam) यांच्या लोकमान्य परिवर्तन पॅनलमध्ये लढत झाली. आज सकाळपासून मतमोजणी प्रक्रिया सुरु होती. अशातच मतमोजणी सुरु असताना केंद्रावरील राड्यामुळे पिंपळगाव बाजार समिती निवडणूक चांगलीच चर्चेत आली होती. 


लासलगाव बाजार समितीनंतर महत्वाची असलेली पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत पुन्हा दिलीप बनकर यांनी वर्चस्व स्थापित करण्यात यश मिळवले. 18 पैकी 11 जागांवर विजय संपादन केल्याने माजी आमदार अनिल कदम यांचे सत्तेचे स्वप्न भंगले. तर अपक्ष उमेदवार यतीन कदम यांनी 288 मते मिळवून विजय संपादन केल्याने त्यांच्या विजयाची जोरदार चर्चा सुरू आहे. यात विशेष म्हणजे दिलीप बनकर आणि अनिल कदम या दोन नेत्यांचे आव्हान असतांना देखील यतीन कदम या अपक्ष उमेदवाराने निवडणूक लढवत ग्रामपंचायत गटातून विजयही मिळवल्याने यतीन कदम यांच्या कार्यकर्त्याकडून मतमोजणी केंद्राबाहेर आनंदोत्सव साजरा करण्यात आला.


 


पिंपळगाव बाजार समितीतील विजयी उमेदवार 


दरम्यान पिंपळगाव बाजार समितीचा संपूर्ण निकाल हाती आला असून या ठिकाणी राष्ट्रवादीने ठाकरे गटाचा पराभव केला आहे. राष्ट्रवादीने अकरा जागांवर विजय मिळवला तर ठाकरे गटाचे सात उमेदवार विजयी झाले आहेत. तर अपक्ष उमेदवार यतीन कदम यांनी २८८ मते मिळवून विजयश्री खेचून आणली. तर शेतकरी विकास पॅनलकडून व्यापारी गटातून सोहनलाल भंडारी, शंकर ठक्कर, ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून शिरीष गडाख, सोसायटीत गटातून दिलीप बनकर, दीपक बोरस्ते, ज्ञानेश्वर शिरसाठ, रामभाऊ माळोदे, महिला राखीव गटातून मनीषा खालकर, ग्रामपंचायतच्या अनु. जाती राखीव गटातून नंदु गांगुर्डे , विमुक्त भटक्या जमाती प्रवर्गातून जगन्नाथ कुटे तर लोकमान्य परिवर्तनकडून सोसायटी गटातून अनिल कदम, प्रल्हाद डेर्ले, गोकुळ गिते, आर्थिक दुर्बल गटातून राजेश पाटील, स्री राखीव गटातून अमृता पवार, इतर मागास वर्गीय गटातून दिलीप मोरे हे उमेदवार विजयी झाले आहेत.