APMC Election : एकीकडे नाशिक (Nashik) जिल्ह्यातील बाजार समितींमध्ये महाविकास आघाडीने (Mahavikas Aaghadi) मुसंडी मारल्याचे चित्र असताना जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातही अनेक बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीने एकहाती सत्ता मिळवली आहे. पारोळा बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांचे मार्केट कमिटी बचाव पॅनल ने 18 पैकी पंधरा जागांवर विजय नोंदवत पारोळा बाजार समितीवर एक हाती सत्ता मिळवली आहे. शिंदे गटाचे विद्यमान आमदार चिमणराव पाटील (Chimanrao Patil) यांना पराभवाची धूळ चारत मोठा धक्का दिला आहे.


जळगाव जिल्ह्यातील अनेक बाजार समित्यांचा निकाल हाती येत असून आता पारोळा बाजार समितीत (Parola Bajar Samiti) महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. या बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांनी शिंदे गटाचे विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांना पराभवाची धूळ चारत मोठा धक्का दिला आहे.या निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या जयकिसान पॅनल ला केवळ तीन जागांवरच विजय मिळवता आला आहे.  बाजार समितीच्या 18 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीच्या मार्केट कमिटी बचाव पॅनलचे उमेदवार विजयी झाल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी केला आहे. बाजार समितीत विजयाचा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. 


पारोळा बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीचे मार्केट कमिटी बचाव पॅनल व शिंदे गटाचे विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांचे जयकिसान पॅनलमध्ये सरळ लढत झाली. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील तसेच ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हर्षल माने यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे पॅनलने बाजी मारली आहे. या निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या जयकिसान पॅनलला केवळ तीन जागांवरच विजय मिळवता आला आहे. आईवेळी कार्यकर्त्यांनी बँडच्या तालावर नृत्य करत तसेच क्रेनच्या माध्यमातून गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी मोठा आनंद व्यक्त केल्याचा पाहायला मिळाल. विजयानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने भव्य रॅली काढण्यात आली.  


भुसावळ बाजार समितीवर भाजपाची सत्ता 


भुसावळ बाजार समितीवर (Bhusawal Bajar Samiti) भाजपचे आमदार संजय सावकारे यांच्या भाजप शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलने 18 पैकी 15 जागांवर विजय मिळवत भुसावळ बाजार समितीवर एक हाती सत्ता मिळवली आहे. भुसावळ तालुक्यातील जनता ही आमच्या पाठीशी असल्याचं सिध्द झाल असून त्या सर्व जनतेचे मी आभार व्यक्त करतो. बाजार समितीचे निवडणुकीत विधानसभेची रंगीत तालीम समजली  जाते. त्यामूळे आगामी निवडणुकांमध्ये भाजपालाच यश मिळेल अशी प्रतिक्रिया विजयानंतर भाजप आमदार संजय सावकारे यांनी दिली आहे. गेल्या काळात भुसावळ बाजार समिती ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती. माजी आमदार संतोष चौधरी यांचे या बाजार समितीवर वर्चस्व होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत बाजार समितीवर भाजप शिंदे गटाने त्यांचा झेंडा फडकवला आहे.