Nashik Police : नाशिक शहरातील (Nashik) वाढती गुन्हेगारी, कोयता गँगची दहशत आणि सर्रास केले जाणारे प्राणघातक हल्ले या सर्वांना लगाम घालण्यासाठी नाशिक पोलिसांनी नवा आदेश काढला आहे. त्यानुसार आता कोयता खरेदी करण्यासाठी आधार कार्ड दाखवावं लागणार आहे. अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीतील वाढता सहभाग आणि त्यांच्याकडून वापरले जाणारे कोयते याचा प्रभाव कमी करण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी एक नवीन नियमावली तयार केली आहे. 


गेल्या काही दिवसांत नाशिक शहरात पोलिसांचा (Nashik Police) वचक कमी झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कारण सर्रास दिवसाढवळ्या खून (Murder), अत्याचार, प्राणघातक हल्ल्यांनी शहर हादरत आहे. कोणीही किरकोळ कारणावरून कोयत्याने, चाकूने हल्ले करत असल्याचे नागरिकांना दिसून येत आहे. त्यामुळे पोलीस कारवाई होऊनही कोयता गँगची (Koyata Gang) दहशत कायम आहे. शहरातील विविध भागात मागील काही दिवसांत कोयत्याच्या सहाय्याने माजवलेली दहशत, कोयता गँगने मांडलेला उच्छाद या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी कडक पावले उचलली आहेत. यापुढे बेकायदेशीररीत्या कोयते विक्री करताना कुणी आढळल्यास अथवा कोणाकडे कोयता आढळल्यास संबंधिताला कारवाईलादेखील सामोरे जावे लागणार आहे.


दरम्यान या संदर्भात नाशिक पोलिसांनी (Nashik Police) आदेश काढले असून वाढती रोखण्यासाठी पोलिसांनी कोयत्यासाठी 'आधारसक्ती केली आहे. त्यामुळे आता कोणत्याही ग्राहकाला आधार क्रमांकाशिवाय कोयत्यासह धारदार वस्तूची विक्री करता येणार नाही. जीवनावश्यक वस्तू विक्री करणाऱ्यांनाही हे नियम बंधनकारक असल्याची कठोर भूमिका पोलिसांनी घेतली आहे. सार्वजनिक ठिकाणी, व्यापारी पेठ, चौकात, शाळा-कॉलेज आवारात कोणीही हत्यारे बाळगणार नाही, असे आदेशात म्हटले आहे. त्याअंतर्गत शहरातील कोयते विक्रेत्यांना आता कोयते खरेदी करणाऱ्यांची नोंद ठेवावी लागणार आहे. आधार कार्ड बघूनच त्यांना ग्राहकांना कोयते विकावे लागणार आहेत. 


खरेदीसाठी काय आवश्यक असणार? 


नाशिक शहरा आता मनाई आदेशान्वये या वस्तू फक्त जीवनावश्यक कामांसाठी विक्री करता येतील. त्यासाठी ग्राहकांची माहिती नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासह अंमलबजावणी करण्यास टाळटाळ केल्यास अथवा उल्लंघन केल्यास संबंधितांवर शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल होणार आहेत. कोणत्याही ठिकाणी कोणीही व्यक्ती कोयता व शस्त्र नियमांशिवाय विक्री करणार नाही. कृषी साहित्य, खाद्यपदार्थ व इतर जीवनावश्यक वस्तूंखेरीज कोयता व शस्त्र विक्री करता येणार नाही. शस्त्र विक्री करताना खरेदीदाराचे नाव, मोबाइल क्रमांक, पत्ता, आधार क्रमांक नोंद करणे आवश्यक आहे. जीवनावश्यक प्रयोजनाकरता कोयता व शस्त्र विकणाऱ्यांनाही हे नियम बंधनकारक आहे, असे आदेशात म्हटले आहे.


नाशिक पोलिसांनी वचक वाढवा!


नाशिक शहरामध्ये खून, खूनाचा प्रयत्न, मारहाणीसह गंभीर दुखापतीचे गुन्हे वाढत आहेत. त्यामध्ये कोयत्यासह इतर शस्त्रांचा वापर होत असल्याने मनाई आदेश लागू करण्यात आले आहे. कोयता खरेदीसाठी आधार क्रमांक, खरेदीदाराचे नाव, मोबाईल क्रमांकाची सक्ती करण्यात आली. प्रत्यक्षात गुन्हेगार व हल्लेखोर धारदार शस्त्रे व हत्यारे चोरीछुपे पद्धतीने खरेदी करतात. मनाई आदेश असू किंवा नसो, त्यांना काहीच फरक पडत नसल्याने भद्रकालीतील घटनेवरून समोर आले. पोलिसांनी कोयता खरेदीसाठी आधारसक्ती करण्यापेक्षा वचक वाढवावा, शहरात गस्त वाढवावी, प्रतिबंधतात्मक कारवाई करावी. त्यातून जरब बसेल, असे नागरिकांमध्ये चर्चा सुरु आहे.