Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक दहा वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. घरात दोघे भाऊ झोका खेळत असताना अचानक एकाला गळफास लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. क्षणभर भावाला काहीच उमगलं नाही, जेव्हा घरातल्या लोकांना ही बाब कळली, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
नाशिकच्या अंबड भागातील (Ambad) चुंचाळे अश्विन नगर परिसरात म्हाडा कॉलनीत ही घटना घडली आहे. निखिल निंबा सैंदाणे याला घरातील छतास लोखंडी हुकला लावलेल्या झोक्याच्या दोरीचा फास बसल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वडील कंपनीमध्ये कामाला गेले होते. तर आई काही कामासाठी शेजारी गेली होती. निखिल आणि त्याचा लहान भाऊ घरात एकटेच झोका खेळत होते. धाकट्याचा झोका घेऊन झाल्यावर निखिलने झोका खेळायला सुरुवात केली. पलंगावरुन तो झोका खेळत होता. त्याने झोका गोल गोल फिरवला आणि त्याच्या मानेला झोक्याची दोरी आवळली गेली. आधी तो पलंगावर असल्याने त्याला ते जाणवले नाही मात्र त्याने उंच झोका घेण्याचा प्रयत्न त्याच्या गळ्याला फास लागला आणि तो खाली पडला.
निखिल खाली पडल्यानंतर काहीच बोलत नसल्याने त्याचा भाऊ धावतच आईकडे गेला. निखिल झोक्यावरुन पडला असून काहीच बोलत नसल्याचे आईला सांगितले. निखिलच्या आईने तातडीने घराकडे धाव घेतली. निखिल निपचित पडला होता. आईने तात्काळ दोरी कापून त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत सगळं संपलं होत. आईनं हंबरडा फोडला. आवाज ऐकून शेजारचे लोक जमा झाले होते. सगळ्यांनी त्याला जिल्हा रुग्णालयात (Nashik Civil Hospital) नेले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात (Ambad Police) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अचानक घडलेल्या घटनेने सैंदाणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. क्षणात खेळत असलेल्या मुलाबाबत असे झाल्याने त्याचे आई-वडील सुद्धा झाले असून आपल्याशी खेळत असलेला आपला दादा कुठे गेला, अशी शोधणारी नजर निखिलच्या धाकट्या भावाची झाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
लहान मुलांकडे लक्ष द्या
एकीकडे सध्या सर्वांचंच आयुष्य धावपळीचं झालं आहे. सकाळी ते रात्री घर. महिला देखील घर काम आवरून जॉब करत असतात. मात्र अशात लहान मुलांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. या माध्यमातून अशा घटना उघडकीस येत आहेत. नाशिक शरासह आजूबाजूच्या परिसरात अनेकदा घटना घडत आहे. कधी स्विमिंग टँकमध्ये पडून, कधी हौदात पडून, कधी अंगावर गरम पाणी पडल्याने, तर अनेक मुले वस्तू गिळत असल्याने अशावेळी देखील पालकांनी सजग राहून मुलांकडे लक्ष दिले पाहिजे.
हेही वाचा :