Nashik News : नाशिक महापलिकेच्या (Nashik Mahapalika) माध्यमातून बिटको रुग्णालयात (Bitko Hospital) वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा प्रस्ताव सुरु असताना आता या वैद्यकीय महाविद्यालयास ब्रेक देण्याचा आला आहे. सद्यस्थितीत सुरु असलेल्या बिटको रुग्णालय १०० टक्के क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर हे महाविद्यालय सुरु करण्यात येईल अशी माहिती मनपा वैद्यकीय अधीक्षक बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली. 


नाशिक महापालिकेच्या रुग्णालयांना पुरेसे डॉक्टर उपलब्ध व्हावे यासाठी पदव्युत्तर पदवी वैद्यकीय शिक्षण क्रम चालवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरु केले. त्यानुसार नाशिकमध्ये मनपाच्या बिटको रुग्णालयात वैद्यकीय शिक्षणक्रम सुरु करण्यात येणार होता. मात्र हा विषय पुढे ढकलण्यात आला असून बिटको रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयांकडे मोर्चा वळविण्यात येणार आहे. 


नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागात डॉक्टरांची कमतरता असून त्यामुळे नवीन बिटको, गंगापूर, मुल्तानपुरा अशी अनेक रुग्णालये सुरू होऊ शकलेली नाही. कोरोना काळात तात्पुरत्या स्वरूपात डॉक्टर्स घेण्यात आले, परंतु कोरोना प्रादुर्भाव कमी होताच त्यांना कामावरून कमी करण्यात आले. त्यानंतर मनपा रुग्णालयात जनरल फिजिशियन पासून अनेक डॉक्टर उपलब्ध नाहीत. रुग्णालयांचा डोलारा उभा केला परंतु डॉक्टरच नाहीत असा प्रकार आहे. त्यामुळे महापालिकेच्या बिटको रुग्णालयात पदव्युत्तर पदवी शिक्षणक्रम सुरू करण्याचे ठरविण्यात आले होते. अशा प्रकारचे शिक्षणक्रम सुरू झाल्यानंतर पदवीधर डॉक्टर्स पुढील शिक्षण घेण्यासाठी येतानाच प्रत्यक्ष महापालिकेच्या रुग्णालयात कामकाज करणार असल्याने महापालिकेला मोठी मदत होणार होती. 


वैद्यकीय महाविद्यालय उभारायचे म्हणून मुंबई येथील सीपीएस कोर्स सुरू करण्यासाठी त्यांच्याशी पत्र व्यवहार करण्यात आला. तसेच भारतीय आयुर्विज्ञान संस्थेकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यांनी अशा प्रकारचे शिक्षणक्रम सुरू असताना वैद्यकीय महाविद्यालयाची संलग्नता घ्यावी अशी अट घातली. त्यानुसार नाशिक महापालिकेने नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेकडे प्रस्ताव पाठवला. त्यांनी अनुकूलता दर्शवल्यानंतर महापालिका आणि मविप्र यांच्यात करार देखील झाला. 


दरम्यानच्या काळात नवीन बिटको रुग्णालय सुरू करण्यासाठी आयुक्त रमेश पवार यांनी हालचाली सुरू केल्या. त्यांनी स्वतः रुग्णालयास भेट दिल्यानंतर आता बाह्यरुग्ण विभाग सुरू झाला असून लवकरच शस्त्रक्रिया कक्ष सुरू होणार आहे. मात्र बिटको रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याने ते पूर्णपणे कार्यान्वित केल्या नंतर पदव्युत्तर शिक्षणाचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे तूर्तास हा प्रस्ताव बाजूला पडला आहे. 


वैद्यकीय महाविद्यालयाच्या पार्श्वभूमीवर मनपा वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे म्हणाले कि, नाशिक महापालिकेच्या वतीने पदव्युत्तर शिक्षणक्रम सुरू करण्यासाठी तयारी करण्यात आले आहे. मात्र नवीन बिटको रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येईल. त्यानंतर महापालिका स्तरावर तयारी करून मगच हा विषय पुढे नेण्यात येणार आहे.