Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरातील गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नसताना खुनाची (Murder) आणखी एक घटना समोर आली आहे. शहरातील अंबड परिसरात (Ambad Area) एका विवाहितेचा निघृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. 


नाशिक शहरातील अंबड परिसरातील दत्तनगर भागात हा खून झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड पोलिसांना (दि.२७) रात्री अडीच वाजेच्या सुमारास औरंगाबाद येथील शहर नियंत्रण कक्षातून फोन आला. नाशिक शहरातील वरचे चुंचाळे येथील दत्तनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर या ठिकाणी एका महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याची माहिती दिली. ही माहिती मिळताच उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त सोहेल शेख, अंबड पोलिस ठाण्याचे वपोनी भगीरथ देशमुख, पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीकांत निंबाळकर, सपोनि गणेश शिंदे आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.


यावेळी दत्तनगर भागातील वसाहतीत औरंगाबाद येथील वाळुंज औद्योगिक वसाहतीत राहणारी संगीता सचिन पवार (२२) हिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. दरम्यान संगीता हिचा गळा चिरून खून करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यावरून पोलिसांनि तपासाची चक्रे फिरवत तपासाला गती दिली. अंबड पोलिस ठाण्याचे एक पथक औरंगाबादच्या दिशेने मृत महिला संगीताच्या पतीकडे विचारपूस करण्यासाठी रवाना झाले.


संगीता व तिचा पती हे मुलासह गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वीच चुंचाळे येथे राहायला आले होते. दरम्यान तिचा पती हा पेंटिंग व्यवसाय करत असल्याची नोंद त्यांनी घर मालकाला दिली होती. या प्रकरणी औरंगाबाद पोलिसांनी घटनेची माहिती अंबड पोलिसांना दिल्यानंतर हि घटना समोर आली. यावेळी तिच्या पतीने  घरात पत्नीचा मृतदेह पाहून त्याठिकाणाहून पळ काढत थेट औरंगाबाद गाठून तेथील पोलिसांना याबाबतची माहिती दिली. 


पतीने गाठले औरंगाबाद 
काही दिवसांपूर्वी संगीता व पती दत्तनगर भागात राहण्यास आले होते. काल (दि.२७) रात्रीच्या सुमारास घटना घडल्यानंतर संगीतास रक्ताच्या थारोळ्यात पाहून पतीने रातोरात औरंगाबाद शहर गाठले. औरंगाबाद येथे जाऊन थेट पोलीस ठाण्यात घटनेची माहिती दिली. त्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी नाशिक येथील अंबड पोलिसांत रात्री अडीच वाजता याबाबत कळविले. 


पोलिसांकडून घातपाताचा संशय 
अंबड पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यांनतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी संगीताच्या गेल्यावर तीक्ष्ण हत्याराने वार झाल्याचे आधालूं आले. तिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. तर तिच्या पतीने रातोरात औरंगाबाद शहर गाठले. यामुळे पोलिसांचा संशय बळावला असून हा घातपात असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.