Nashik Crime : नाशिकच्या (Nashik) अन्न व औषध प्रशासनाने महत्वाची कारवाई केली असून मुंबईला (Mumbai) जाणारा ट्रक इगतपुरी (Igatpuri) परिसरात ताब्यात घेण्यात आला आहे. या ट्रकमधून प्रतिबंधित असलेला गुटखा वाहतूक करताना 1 कोटी 95 लाख 87 हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. 


अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी गुप्त माहितीच्या आधारे वाडीवऱ्हे येथे 1 कोटी 95 लक्ष 87 हजार किमतीचा गुटखा जप्त केला आहे. या सह 30 लाख किमतीचे 2 कंटेनर सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहेत. वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु करण्यात आला आहे. ही धडक कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे, अन्न औषध प्रशासनाचे सह आयुक्त गणेश परळीकर, सहाय्यक आयुक्त उदय लोहकरे, मनिष सानप यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी गोपाळ कासार, अमित रासकर यांनी केली आहे.


सदरचे वाहन हे मुंबईच्या दिशेने निघाले होते. यात महाराष्ट्र राज्यता प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली. त्यानुसार त्यांनी पथक कार्यान्वित करून मोहीम सुरु केली. नाशिक शहरातून हे मुंबईच्या दिशेने निघालेले असताना नाशिक मुंबई मार्गावर गुरुनानक ढाब्याजवळ सापळा रचण्यात आला. अन्न व औषध प्रशासन विभागातील अधिकारी यांनी पाठलाग करून व सापळा रचून गुरुनानक ढाबा परिसरात दोन मोठे कंटेनर पकडून झाडाझडती केली असता त्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा आढळून आला. पैकी एका वाहनातून संशयित पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना अधिकाऱ्यांनी फिल्मी स्टाईलने त्याचा 1 किलोमीटरपर्यंत पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या.  


दरम्यान ताब्यात घेतलेल्या वाहनातून एकूण 1 कोटी 50 लाख 54 हजार किमतीचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. तसेच दुसऱ्या वाहनातून एकूण 45 लाख 33 हजार किमतीचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे दोन्ही कंटेनर मिळून एकूण 1 कोटी 95 लक्ष 87 हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा व अंदाजे 30 लाख किमतीचे दोन कंटेनर अन्न औषध प्रशासनाने जप्त करून वाडीवऱ्हे पोलिसांच्या ताब्यात पुढिल कारवाईसाठी दिले आहेत. तसेच वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढिल तपास वाडीवऱ्हे पोलीस ठाणे करीत आहे. 


टोल फ्री क्रमांकारवर संपर्क साधण्याचं आवाहन
नाशिक विभागातील सर्व किराणा, पान टपरी अशा अन्न पदार्थाच्या व्यावसायिकांनी आपल्या दुकानातून प्रतिबंधित पदार्थाची विक्री करु नये. अन्न किंवा औषध संबंधात कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन नाशिक विभागाचे सह आयुक्त गणेश परळीकर यांनी केलं आहे. मागील काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा तडाखा लावला आहे. ऐन दिवाळीत त्यांनी अनेक ठिकाणांवर कारवाई केली होती.