Nashik News : शिंदे-फडणवीस सरकारचा महत्वपूर्ण उपक्रम असलेला शासन आपल्या दारीचा नाशिक (Nashik) जिल्ह्यातील कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. राज्यातील सत्ता समीकरणे बदलल्यानंतर पहिलाच शासन आपल्या दारी कार्यक्रम नाशिकमध्ये होणार होता. मात्र काही अपरिहार्य कारणामुळे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 


शिंदे फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Government) स्थापन झाल्यानंतर राज्यभरात शासन आपल्या दारी उपक्रमाद्वारे अनेक सोयी सुविधा शासनाकडून नागरिकांना देण्यात येत आहे. शासन आपल्या दारीचा हा कार्यक्रम नुकताच जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे देखील उपस्थित होते. त्यानुसार पुढील कार्यक्रम नाशिक (Nashik District) जिल्ह्यात होणार होता. या कार्यक्रमाची तारीखही ठरली होती, मात्र आता अचानक हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. नुकतंच राज्यातील सत्ता समीकरणे बदलल्याने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. 


'शासन आपल्या दारी' उपक्रमात जनतेला स्थानिक स्तरावरच एकाच छताखाली विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येत आहे. शासन मार्गदर्शनानुसार राज्यभरात एकाचवेळी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत नाशिकमध्ये येत्या 8 जुलैस नियोजित कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभणार होती. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील तपोवनातील मोदी मैदानावर कार्यक्रम आयोजनाची प्रशासनाने तयारी सुरू केली होती. शिवाय या कार्यक्रमात लाभार्थीना योजनांचे प्रमाणपत्र वितरणासह तेथे शासकीय विभागांचे माहितीपर विविध 25 स्टॉल्स उभारण्यात येणार होते, मात्र अचानक कार्यक्रम रद्द झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 


प्रशासनाकडून सर्व तयारी, मात्र.... 


नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 15 तालुक्यांमध्ये एकूण 70 शिबिरे घेण्यात आली. 2लाख 44 हजार नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या उपक्रमाचाच भाग असलेला मुख्य कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात घेण्यात येत असून, त्यास मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहत आहेत. नाशिक जिल्ह्यासाठीचा कार्यक्रम 8 जुलैला घेण्याचे निश्चित झाले होते. तपोवन परिसरातील मैदानात हा कार्यक्रम घेण्यात येणार होता, त्यासाठीची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरू केली होती. त्यामुळे पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील कार्यक्रमासाठीच्या नियोजनासाठी आढावा बैठक घेतली होती. तसेच कार्यक्रम स्थळाची देखील पाहणी भुसेंसह जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केली होती. मात्र हा कार्यक्रम काही अपरिहार्य कारणामुळे पुढे ढकलण्यात आला आहे.