Nandurmadhyameshwer Dam : नाशिक (Nashik) जिल्ह्यात अति उत्साही पर्यटकांची नांदूरमधमेश्वर (NandurMadhyameshwer Dam) धरणावर स्टंटबाजी सुरूच आहे. नांदूरमधमेश्वर धरणासमोरील पुलावर हौशी पर्यटक जीवाची परवा न करता स्टंटबाजी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे जीव धोक्यात घालून फोटो घेण्याचा मोह जीवावर बेतू शकतो, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. 


नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरु असून गंगापूर व दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरीच्या (Godavari River) पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली आहे. हेच पाणी पुढे नांदूरमध्यमेश्वर धरणात जाते. त्यामुळे गोदावरी आणि दारणा नदीचे पाणी नांदूरमध्यमेश्वर धरणात आल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे येथे पुन्हा पर्यटकांनी गर्दी केल्याचे समोर आले आहे. येथील पुलाला धडकणाऱ्या लाटा, प्रचंड वेगाने येणारे पाणी यामुळे धरणावर पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. मात्र हि गर्दी उसळत्या पाण्यात उभे राहून फोटोसेशन करत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल हो आहे. 


दरम्यान नांदूरमध्यमेश्वर धरणातून प्रचंड वेगात येणारे पाणी समोरच्या पुलावर धडकून लाटा तयार होत आहेत. याच लाटांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक जीव धोक्यात घालून वाहत्या पाण्यात जात आहेत. अनेक हौशी पर्यटक उसळलेल्या पाण्यात अंघोळ करताना दिसून येत आहेत तर काही पर्यटक उसळलेल्या पाण्याची परवान न करता या पुलावर मुक्त संचार करताना दिसतात. यापूर्वी देखील नांदूरमधमेश्वर धरणावर अशा प्रकारे स्टंटबाजी करतानाचे पर्यटकांचे व्हिडिओ समोर आले होते. प्रशासनाने वेळोवेळी सूचना देऊन देखील अशा प्रकारे स्टंटबाजी सुरू आहे. अशात पाण्यात आत्मघातकी खेळ करतानाचे हे थरारक दृश्य पाहून पुढे चालून काही बरेवाईट झाल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होते. 


सेल्फीसाठी काहीही! 
नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काही प्रमाणात वाढल्याने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला होता. दारणा गंगापूर या धरणातील सर्व पाणी नांदूरमध्यमेशवर बंधाऱ्यात एकत्र येत आणि इथून पुढे हेच पाणी जायकवाडीच्या दिशेने जाते. मात्र नांदूर मध्यमेश्वरचा विसर्ग झाल्या झाल्या समोरच असलेल्या पुलावर पाणी आदळून पुढे जाते आणि ह्याच पाण्यात महाविद्यालयीन तरुण तरुणी, नागरिक सेल्फी काढण्यासाठी येत आहेत. शिवाय फोटोसेशनसाठी लहान मुलांचाही जीव धोक्यात घालत आहे. कोणी स्टंटबाजी करतंय, कोणी हुल्लल्डबाजी करतंय तर कोणी चक्क अंघोळीलाच बसलंय मात्र हा अतिउत्साह हे हे धाडस जीवितावर बेतू शकतं ह्याची पुसटशी कल्पनाही ह्या सेल्फी बहाद्दराना नसल्याचे या व्हिडीओतुन दिसते आहे.