Nashik News : नाशिक (Nashik) शहरातील अंबड परिसरातील वाढत्या गुन्हेगारीवर (Crime) नियंत्रण मिळविण्यासाठी अंबड पोलिस ठाण्याचे (Ambad Police Station) विभाजन करून अंबड औद्योगिक वसाहतीत स्वतंत्र पोलिस ठाण्याची निर्मिती करावी, या अनेक वर्षांच्या मागणीसाठी अंबड वासिय रस्त्यावर उतरले असून नाशिक ते मुंबई अर्धनग्न पायी मोर्चाला काढण्यात आला. मात्र आमदार सिमा हिरे यांच्या मध्यस्थीने पालकमंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा करण्यात येणार असून मंत्री भुसे काय निर्णय याकडे लक्ष लागले आहे. 


नाशिक शहरासह उपनगरांत दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. अंबड परिसरातही यापूर्वी अनेक खुनाच्या (Murder) घटना घडल्या आहेत, तर काही दिवसांपूर्वीच एका वृद्धाचा खुनाची घटना घडली होती. खून, दरोडे,प्राणघातक हल्ले, चोरी, चैन स्नॅचिंग अशा प्रकारच्या घटनांनी अंबड परिसरात उत आणला आहे. जणू गुन्हेगारांना शहर पोलिसांचा धाकच उरला नसल्याचे या घटनांमधून दिसून येत आहे. त्यामुळे अंबड परिसरातील नागरिकांनी यापूर्वी देखील स्वतंत्र पोलीस ठाण्याची मागणी केली होती. मात्र आता थेट अंबड वासिय रस्त्यावर उतरले असून त्यांनी नाशिक ते मुंबई असा अर्थ नग्न मोर्चा काढला. मात्र तत्पूर्वीच त्यांना रोखण्यात येऊन पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्याशी चर्चा केली जाणार असल्याचे समजते.


अंबड पोलीस ठाण्याचे क्षेत्र मोठे असून चुंचाळे, दत्तनगर, एक्सलो पॉईंट भागातील नागरिकांना अंबड पोलीस ठाणे गाठावे लागते. शिवाय एखादी घटना घडल्यास पोलिसांना देखील चुंचाळे दत्तनगर भागात पोहोचण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे या परिसरात स्वतंत्र पोलीस ठाणे व्हावे यासाठी येथील नागरिकांनी स्थानिक आमदार, पोलीस आयुक्त यांना यापूर्वी निवेदन दिले होते. तसेच वेळोवेळी देखील आंदोलने केली होती. अंबड, चुंचाळे या गावासह औद्योगिक वसाहतीत गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली असून संशयितांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश येत नाही. भौगोलिक दृष्ट्या मोठ्या असलेल्या या भागावर अपुऱ्या मनुष्यबळ अभावी वास ठेवून अंबड पोलिसांना शक्य होत नसल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यामुळे अंबड पोलीस अंबड औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलिस ठाण्यांची निर्मिती करावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी, कामगार, कारखाना मालकांकडून जोर धरू लागली. त्या मागणीसाठी अनेक वेळा निवेदन देऊन उपयोग झाला नाही. त्यामुळे आज नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरून अर्ध नग्न मोर्चा काढला. दरम्यान गरवारे पॉईंटपर्यंत आंदोलन पोहोचल्यानंतर आमदार हिरे यांनी मध्यस्थी केली. 


पालकमंत्र्यांशी चर्चा
दरम्यान सकाळी अंबड शहरातून निघालेला हा मोर्चा अर्धा रस्त्यात आल्यानंतर आमदार सीमा हिरे यांनी मध्यस्थी करत मोर्चा थांबवण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर पालकमंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा करून मार्ग निघेल असे आश्वासन यावेळी हिरे यांनी दिले. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून पालकमंत्र्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आता पालकमंत्री नेमकी याबाबत काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.