Nashik Crime News: नाशिकमधील अंबड औद्योगिक वसाहतीतील एक्स्लो पॉइंट येथील 65 वर्षीय वृद्धाच्या खुनाची उकल झाली असून पुतण्यानेच प्रॉपर्टीच्या वादातून काकाचा काटा काढल्याचे समोर आले. यात अल्पवयीन संशयितास सुपारी देऊन खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान 25 नोव्हेंबर रोजी बच्चू कर्डीले यांच्या खुनाची घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण अंबड परिसर हादरला होता. या प्रकरणी सागर ऊर्फ पांडू वाळू कर्डेल नामक पुतण्याला ताब्यात घेतले असून त्याचबरोबर चुंचाळे शिवारात राहणाऱ्या अल्पवयीन मुलाला अंबड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

 

अंबड परिसरातील एक्स्लो पॉइंट परिसरात कर्डेल कुटुंबीय वास्तव्यास आहे. या परिसरासह इतर ठिकाणी कर्डीले मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्ता असून, शेतीही आहे. 25 नोव्हेंबरला कर्डीले कुटूंबीय हळदीच्या कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. तर बच्चू कर्डीले हे त्या रात्री घरात एकटेच होते. रात्री दहाच्या सुमारास ते घरात एकटे बसलेले असताना संशयित अल्पवयीन मुलाने पाठीमागून येऊन त्यांच्या डोक्यात धारदार कोयत्याने वार केले. कर्डीले यांच्या वार वर्मी बसल्याने ते जागीच ठार झाले. त्यानंतर संशयिताने घरातील लहान आकारातील कोठी पळवून नेली होती. कोठीत सात-आठ लाखांची रोकड व कागदपत्रे असल्याचे सांगण्यात आले होते.

 

संशयित सागर आणि मयत बच्चू कर्डेल यांच्यात जमिनीवरुन वाद

 

याप्रकरणी अंबड पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, पोलिसांच्या हाती काहीही धागेदोरे मिळत नव्हते. अखेरीस शोध पथकाला परिसरातील खबऱ्यांकडून संशयित सागर आणि बच्चू कर्डेल यांच्यात जमिनीवरुन वाद असल्याचे समजले होते. त्याच दिशेने तपास केल्यानंतर पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे लागले. त्यानुसार, अंबड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने  चुंचाळे शिवारातून अल्पवयीन संशयितासह सागर कर्डेल यास त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे.

 

अल्पवयीन बालकास दिली सुपारी...


याप्रकरणी गुन्हे शाखेसहित आयुक्तालयाची चौदा पथके गुन्ह्याचा तपास करीत होते. सागर कर्डेल याने जमिनीच्या वादातून बच्चू कर्डेल यांच्या खूनाचा कट रचला. त्याने चोऱ्या-माऱ्या करणाऱ्या चुंचाळे शिवारातील अल्पवयीन मुलास बच्चू कर्डिले यांच्या खुनाची सुपारी दिली. 25 नोव्हेंबर रोजी घरी कोणीच नसल्याची संधी साधून दोघांनी बच्चू कर्डेल यांचा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले.


ही बातमी देखील वाचा