त्र्यंबकेश्वर, नाशिक : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) मंदिरात भाविकांची तुफान गर्दी उसळली आहे, पहाटेपासून मंदिराबाहेर जवळपास 400 मीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. दरम्यान गर्दी वाढल्याने त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने दहा वाजेच्या सुमारास देणगी दर्शन बंद केले. मात्र तरीदेखील भाविकांची रीघ वाढतच होती, सुमारे एक लाख भाविकांनी त्र्यंबकेश्वर राजाचे दर्शन घेतल्याचे दिसून आले. 


नाशिक (Nashik) जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आद्य ज्योतिर्लिंग असल्याने देश-विदेशातून लाखो भाविक येत असतात. त्यामुळे त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) हे नेहमी गजबजल्याचे दिसून येते. त्यातच यंदा अधिक मास (Adhik Mas) आल्याने मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. उद्याच्या दिवस सोडला तर सलगच्या सुट्ट्या आल्याने भाविकांसह पर्यटकांनी त्र्यंबकेश्वरला पसंती दिली आहे. आज दिवसभरात लाखो भाविकांनी दर्शन घेतल्याचा अंदाज असून दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश सह उत्तराखंडहून भाविक त्र्यंबकरायाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. तब्बल 3-4 तास उलटूनही दर्शन होत नसल्याचं निदर्शनास आले. 


दरम्यान त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाची संततधार (Heavy Rain) सुरू असल्याने अनेक धबधबेही प्रवाहित झाले आहे. ईथले निसर्ग सौंदर्य अधिकच खुलून उठले असून प्रत्येकजण या निसर्गाच्या प्रेमात पडतो आहे. अधिक महिना संपत आला असून यासोबतच उत्तर भारतीयांचा श्रावण सध्या सुरू असल्याने परराज्यातील भाविक महादेवाच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत. तसेच मराठी माणसांचा श्रावण अर्थातच निज श्रावण महिन्याला देखील 17 ऑगस्टपासून प्रारंभ होणार असल्याने संभाव्य गर्दी लक्षात घेता त्रंबकेश्वरचे व्हीआयपी दर्शन कालपासून 15 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याच्या निर्णयही मंदिर संस्थानने घेतला आहे.


काही काळ देणगी दर्शन बंद 


आज सकाळपासूनच त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी भाविकांची रीघ लागल्याचे पाहायला मिळाले. मंदिरापासून ते आंबडेकर चौकापर्यंत भाविकांच्या रांगाच रांगा लागल्याचे दिसून आले. गर्दीचे स्वरूप लक्षात घेता त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने दहा वाजेच्या सुमारास देणगी दर्शन बंद केले. त्यामुळे ज्या भाविकांना तासभर पूर्व दरवाजाच्या रांगेत दर्शनासाठी ताटकळत उभे राहावे लागत होते. त्यांचा दर्शनाचा मार्ग सुकर झाला आहे. वाढत्या गर्दीमुळे त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) देवस्थान ट्रस्टला आज महाद्वार बंद ठेवावे लागले. तर दुपारच्या सुमारास गर्दी एवढी वाढली की पूर्व दरवाजाच्या रांगेच्या आतील पेंडॉल भाविकांच्या गर्दीने पूर्ण भरून गौतम तलावाजवळ (Gautam Lake) पोहोचले होते. त्यामुळे दोनशे रुपये तिकीट विक्री कक्ष बंद करण्यात आला होता. यावेळी भाविकांना मंदिराच्या आतील उत्तर दरवाजाने मंदिरात सोडले जात होते. सायंकाळी उशिरापर्यंत गर्दी ओसंडून वाहत होती, त्यातच उद्याचा दिवस सोडला तर सलग सुट्ट्या असल्याने भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 


 


इतर संबंधित बातमी :