Saptshrungi Devi : नाशिकच्या (Nashik) वणी येथील सप्तशृंगी देवीच्या (Saptshrungi Devi) शारदीय नवरात्रोत्सवाला (Navratri 2022) प्रारंभ झाला असून काल सायंकाळपासून गडावर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. शिवाय आज पहाटे सप्तशृंगी देवीच्या आभूषणांची विधिवत पूजा व मिरवणूक काढून देवीच्या नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. यावेळी ‘सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते’, मंत्रघोष व ‘अंबे माते की जय’, ‘सप्तशृंगी माते की जय’च्या जयघोषात वणी सप्तशृंगी गड (Saptshrungi Gad) दुमदुमून गेला. 


दोन वर्ष बंद असेलल्या शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून मोठ्या उत्साहात सुरवात झाली असून नाशिक जिल्ह्यासह खानदेशांतील (Khandesh) भाविकांची आदिशक्ती म्हणून ओळख असलेल्या आदिशक्ती सप्तश्रुंगी देवीच्या नवरात्री पर्वाला प्रारंभ झाला आहे. मांगल्य, चैत्यन्य व उत्साहाचे प्रतीक असलेल्या आदिशक्ती सप्तशृंगीमातेच्या नवरात्रीपर्वाला ‘सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते’, मंत्रघोष व ‘अंबे माते की जय’, ‘सप्तशृंगी माते की जय’च्या जयघोषात सोमवारी पहाटेला सुरवात झाली. पहिल्याच दिवशी सुमारे तीस हजार भाविक आदिमायेच्या चरणी नतमस्तक झाले. घटस्थापनेच्या पूर्वसंध्येलाच घटस्थापनेसाठी हजारो भाविकांबरोबरच पोलिसांचा लवाजमा, इतर प्रशासकीय यंत्रणा गडावर दाखल झाली होती. 


सोमवारी पहाटेपासून सप्तशृंगी देवी गडावर भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. पहाटे सहा वाजता सप्तशृंगी निवासिनीदेवी न्यासच्या कार्यालयापासून पुरोहितांना पूजेचे वर्णी दक्षिणा देऊन देवीच्या आभूषणांची जिल्हाधिकारी गंगाथरण डी व नवनियुक्त पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर आभूषणांची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, गेल्या दोनवर्षांपासून कोरोना संकटामुळे राज्यभरात विविध सण साजरे करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र आता कोरोनाच्या 2 वर्षानंतर नवरात्र उत्सव होत असून यामुळे भाविकांची गर्दी होत असल्याने मंदिर प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिराचा परिसर उजळून निघाला आहे. यामुळेच यंदाचा नवरात्रोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार असल्याचं बोललं जात आहे.


चैत्र पौर्णिमेला मोठी यात्रा
सप्तशृंगी गडावर नवरात्री चैत्र पौर्णिमेला मोठी यात्रा भरत असून यावेळी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. नवरात्र उत्सवात दररोज मंदिरात शक्ती पाठ केला जातो. वेगळ्या प्रकारचे चैतन्यदायी वातावरण यावेळी गडावर अनुभवायला मिळतं. देवीजवळ घट बसून नवरात्रात प्रारंभ होतो. नऊ दिवस विविध देवतांचे अर्धना पूजा केली जाते. नवमीच्या दिवशी होम हवन होऊन दशमीला पूर्णहुतीचा कार्यक्रम होतो. नवमीच्या दिवशी मंदिराच्या शिखरावर रात्री वणीच्या दरेगाव मधील गवळी पाटलांच्या हस्ते ध्वज लावला जातो. ध्वज लावण्याचा मान हा परंपरेनुसार गवळी पाटील कुटुंबालाच दिला जातो. शिवाय एवढ्या उंच शिखरावर ध्वज लावून अंगावर कोणत्याही प्रकारची जखम मधुर न लागता ही व्यक्ती सुखरूप खाली परतल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येते.