Trimbakeshwer Jotirling : नाशिकच्या (Nashik) त्र्यंबकेश्वर देवस्थानाची (Trimbakeshwer) जगभर बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग म्हणून ओळख आहे. मात्र याच परिसरामध्ये मद्य आणि मांस विक्री होत असल्याचा धक्कादायक आरोप अटल आखाड्यातील महंत प्रज्ञा पुरी (Mahant Pradnya Puri) यांनी केला आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरातून मद्य आणि मांस विक्रीची दुकाने हटवा अशी मागणी केली आहे. 


त्र्यंबकेश्वर हे जोतिर्लिंगासह धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. मागील दोन वर्षे कोरोना (Corona) काळात हे मंदिर बंद असल्याने भाविक देखील कमी येत होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून निर्बंध शिथिल झाल्याने भाविकांचा ओघ सुरू आहे. त्यातच श्रावण महिन्यात लाखो भाविकांनी त्र्यंबक राजाचे दर्शन घेतले. असे असताना आता याच मंदिर परिसरात मद्य आणि मांस विक्री होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे भाविक भक्त नाराज असल्याची भावना स्थानिकांकडून व्यक्त होते आहे.


दरम्यान या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथील अटल आखाड्याचे महंत प्रज्ञापुरी म्हणाले की त्र्यंबकेश्वर शहरापासून किमान पाच किलोमीटर परिघात मद्य आणि मांस विक्री करणे चुकीचे आहे. त्यामुळे मद्य आणि मांस विक्रीची दुकाने शहराबाहेर असायला हवीत. त्याचबरोबर सध्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांकडून शुल्क आकारले जात आहे. तसे न करता भाविकांना मोफत दर्शन होणे गरजेचे आहे. अन्यथा भाविकांनी मंदिरातील सशुल्क दर्शन टाळून मंदिरावर आर्थिक बहिष्कार टाकावा अशी भूमिका प्रज्ञापूरी यांनी घेतली आहे.


राज्यभरात त्र्यंबकेश्वर येथील जोतिर्लिंग दर्शनासाठी भाविक येत असतात. मात्र याच मंदिराच्या परिसरात मद्य आणि मांसाहाराची दुकान आहेत. एखाद्या ब्राम्हणाच्या घरासमोर मांसाहाराचे दुकान लावणे म्हणजे मोठे पाप असल्याचे वक्तव्य अटल आखाड्याचे महंत प्रज्ञा पुरी म्हणाले. ते पुढे म्हणाले की त्र्यंबकेश्वर हे भाविकांचे श्रद्धास्थान असून येथील प्रथा परंपरा, नियम आदींचे पालन करणे आवश्यक आहे .सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे की, प्रसिद्ध तीर्थक्षेत्र स्थळांवर पाचशे मीटरच्या परिघात मद्य आणि मांसाहारास बंदी आहे. असे आदेश असताना या आदेशाला त्र्यंबकेश्वर नगरीत हरताळ फासला जात असल्याचे महंत प्रज्ञा पुरी यांनी सांगितले.


त्र्यंबकेश्वरला कुंभमेळा भरतो!
दरम्यान त्र्यंबकेश्वर आणि नाशिक शहर परिसरात दर  बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो. त्यातही त्र्यंबकेश्वर अधिकाधिक विशेष धार्मिक महत्व आहे. असे असताना त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग परिसरात सर्रास मद्य विक्रीसह मांस विक्री केली जात असल्याचा आरोप महंतांनी केला आहे.